शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याने टिकेचे धनी ठरलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी निशाणा साधला आहे. दानवे तळागाळातून आलेले आहेत. त्यांना शेतीविषयी माहिती आहे. पण त्यांनी केलेले विधान निषेधार्ह असून सत्तेत बसल्यावर किती बदल होतो, हे दानवेंकडे पाहिल्यावर लक्षात येते. सत्तेमध्ये रममाण झाल्याने त्यांनी असे विधान केले, असा टोला शेट्टी यांनी लगावला. शेतकरी त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.

खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य आणि केंद्र सरकार तुरडाळीबाबत कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. यामध्ये गैरव्यवहार होत असून शेतकऱ्यांना तुरीसाठी १५ दिवसांपासून रांगेत उभे राहावे लागत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २२ ते ३० मे या कालावधीत आत्मक्लेश यात्रा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, कर्जमाफी करावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २२ ते ३० मे दरम्यान आत्मक्लेश यात्रा काढणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पुण्याच्या फुले वाड्यापासून यात्रेला सुरुवात होणार आहे. मुंबईत राजभवन येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत सामान्य नागरिकांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांना एक दिवस द्यावा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

शेती हा राज्याचा विषय म्हणून केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ही जबाबदारी केंद्र सरकार टाळू शकत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राजकीय दबावापेक्षा सामजिक दबावाची गरज आहे.
तसेच एका बाजूला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे सरकार लक्ष देत नाही. तर विजय मल्ल्या हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून मजा मारतोय. हे काय चालू आहे, असा सवालही त्यांनी केला. मल्ल्याकडून हे सरकार कर्जवसुली करत नाही, असेही ते म्हणाले. आत्मक्लेश यात्रेत सदाभाऊ खोत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता, त्यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे ते सहभागी होणार नाहीत, असे सांगून अधिक बोलणे टाळले.