स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिंतन बठकीला कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी दांडी मारली. संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बठक झाली. याच ठिकाणी मुक्कामाची नोंदणी रद्द करीत सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्याशी चर्चा करण्याचे टाळले. त्यामुळे शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये अंतर असल्याचे स्पष्ट झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे विविध कार्यक्रमांसाठी शुक्रवारी शहरात होते. दोघांनीही गुरुवारी शासकीय विश्रामगृहात खोली आरक्षित केली होती. मात्र, त्याच विश्रामगृहात शेट्टी उतरणार असल्याचे समजताच सदाभाऊ यांनी ऐन वेळी पाणीपुरवठा विभागाच्या विश्रामगृहात उतरण्याचा निर्णय घेतला. शेट्टी यांची भेट टाळण्यासाठीच खोत यांनी विश्रामगृह बदलून घेतले. विशेष म्हणजे राजू शेट्टी यांचा मुक्काम असलेल्या विश्रामगृहात विजय शिवतारे, दीपक केसरकर, दिलीप कांबळे हे मंत्रीही उतरले होते. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांवरून या दोघांमधील मतभेद चव्हाटय़ावर आले होते. निवडणुका संपल्यानंतर तरी या दोघांमध्ये दिलजमाई होणार का, हा प्रश्न शुक्रवारी अनुत्तरितच राहिला.

आमच्यामध्ये दुरावा नाही, असे राजू शेट्टी यांनी बठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, खोत यांनी मला टाळलेले नाही. संघटनेच्या कार्यकर्त्यांची बठकीसाठी जागेची कमतरता होऊ नये यासाठी त्यांनी खोली सोडली आहे. सदाभाऊ हे मंत्री असल्यामुळे त्यांच्या शहरात विविध बठका होत्या. त्यामुळे भेट होऊ शकली नाही. सदाभाऊ त्यांची जबाबदारी पार पाडीत आहेत. तर मी संघटनेतील कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम करीत आहे. मात्र दोघामंध्ये कोणत्याही प्रकारचा दुरावा नाही.

निवांत झाल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांची भेट घेणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. शेट्टी आणि मी राहण्यास जवळच आहोत. मात्र दोघांमध्ये किती किलोमीटरचे अंतर पडले आहे, याची मोजदाद केलेली नाही. शासकीय कामामध्ये मी व्यग्र आहे. त्यातून निवांत झाल्यानंतर मी त्यांची भेट घेईन, असेही खोत यांनी पणन मंडळातील बठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.