खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाआघाडीकडे हातकणंगलेसह बुलडाणा आणि वर्धा या जागांची मागणी केली आहे. राष्ट्रवादीने बुलडाणा आणि काँग्रेसने वर्धा लोकसभेच्या जागा द्याव्यात. याबाबत महाआघाडीकडून कोणताही निर्णय कळवण्यात आलेला नाही. आम्ही बुधवापर्यंत (१३ मार्च) आघाडीच्या निरोपाची वाट पाहू. अन्यथा पंधरा जागांवर स्वतंत्रपणे लढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याने आम्ही तेथून लढायला तयार आहोत. माढा मतदार संघात स्वाभिमानीची ताकद आहे. महाआघाडीकडून बुधवापर्यंत प्रतिसाद न आल्यास हातकणंगलेसह, कोल्हापूर, सांगली, माढा, सोलापूर, शिरूर, बारामती, शिर्डी, नाशिक, बुलडाणा, वर्धा, नंदूरबार, परभणी आणि औरंगाबाद या जागा स्वाभिमानी लढवेल. या सर्व जागांसाठी संघटनेच्या उमेदवारांची नावे देखील अंतिम झाली आहेत. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील या वेळी उपस्थित होते.

जानकर आमच्याबरोबर आल्यास स्वागत

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आता भाजप-शिवसेना युतीमधून बाहेर पडावे. ते आमच्याबरोबर आल्यास त्यांचे स्वागत करू, असे खासदार राजू शेट्टी म्हणाले. जानकर यांच्या पक्षाचीही पुण्यात बैठक होती. या निमित्ताने आमची भेट झाली. मात्र, कोणतीही विशेष चर्चा झाली नाही. राजकारणाच्या पलीकडे आमची मैत्री आहे. लहान पक्षांना सर्वच मोठे राजकीय पक्ष त्रास देतात. त्यामुळे जानकर यांनी युतीतून बाहेर पडावे, असा सल्ला त्यांना दिला, असे शेट्टी यांनी सांगितले.