स्वच्छ सर्वेक्षणात आधी अ‍ॅप डाउनलोड करण्याची सक्ती; आता अधिकारी दावणीला

स्वच्छ सर्वेक्षणात ‘अव्वल’ ठरण्यासाठी यापूर्वी आठ लाख नागरिकांकडून स्वच्छ अ‍ॅप डाउनलोड करण्याचे उद्दिष्ट ठेवून दोन लाख नागरिकांकडून ते सक्तीने डाउनलोड करून घेतल्यानंतर सर्वेक्षणाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी आता तब्बल सातशे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा जुंपण्यात आला आहे. प्रभागांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून ४१ प्रभागांसाठी ४१ अधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना दररोज सकाळी प्रभागात फिरून अहवाल देण्याची सक्ती करण्यात आली असून लक्ष्य अ‍ॅपद्वारे माहिती संकलित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पुढील तीन महिन्यांसाठी ही विशेष मोहीम असून, केवळ निकष पूर्ण करून सर्वेक्षणात कागदोपत्री अव्वल ठरण्यासाठी हा सारा आटापिटा सुरू असल्याचेही स्पष्ट होत आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यंदा अनेक महापालिका सहभागी झाल्या आहेत. गुणांची विभागणी, नागरिकांची मते, लोकसहभागाबरोबरच निकषांची ऑनलाइन तपासणी होणार आहे. स्पर्धात्मक, गुणात्मक आणि प्रभावी कामकाज यावर महापालिकांना गुण मिळणार आहेत. त्यामुळे शहराला अव्वल करण्यासाठी अधिकाऱ्यांचा फौजफाटा या कामाला जुंपण्यात आला आहे. सर्वेक्षणातील निकषांची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळा घेतल्यानंतर आता सातशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय कामकाजाबाबत यादी त्यांना देण्यात आलेली असून निकषांची पूर्तता करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी निकषांची पूर्तता कशी केली, याचा अहवालाही प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. प्रभागातील नगरसेवक, नागरिकांची मते आणि सूचना संकलित करणे, स्वच्छ सर्वेक्षणाच्या अ‍ॅपद्वारे आणि मोबाइलद्वारे माहिती संकलित करण्याचे काम या अंतर्गत करण्यात येणार आहे.

त्यासाठी पालिकेने ‘लक्ष्य’ हे अ‍ॅप स्वतंत्रपणे विकसित केले असून त्याद्वारे पाहणीचे निकष नोंदविण्यात येणार आहेत. शहरातील ४१ प्रभागांसाठी ४१ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या अधिकाऱ्यांना प्रभागात प्रत्यक्ष फिरून पाहणी करण्याची सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. परिमंडळाअंतर्गत असलेला क्षेत्रीय कार्यालयाचा भाग, त्यामधील मिळकतींची संख्या, कचरा निर्मूलन आणि नियोजनाची व्यवस्था, परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती आणि सद्य:स्थिती, रस्ते आणि चौकांचे सुशोभीकरण, रस्ते दुभाजकांची अचूक व्यवस्था, मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण होणारा भाग, आवश्यक मनुष्यबळ, कंटेनरची संख्या कमी करण्यासंदर्भातील उपाययोजना करण्यात येणार आहेत.

स्वच्छतेचा मुद्दा कळीचा ठरणार

‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ असा संदेश देत देशात स्वच्छ भारत अभियनाला तीन वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांसाठी स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यास सुरुवात झाली. स्वच्छ सर्वेक्षणात गेल्या काही वर्षांपासून शहराचे मानांकन सुधारले असल्याचा दावा केला जातो आहे. गेल्या वर्षी शहराचे मानांकन काही प्रमाणात घसरले होते. त्यामुळे हा सारा खटाटोप सुरू झाला आहे. मात्र स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहर स्वच्छतेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यास प्रशासनाला सातत्याने अपयश आले आहे. प्रमुख चौकात वा गल्लीबोळात गेल्यास अस्ताव्यस्त पडलेला कचरा, फुटक्या-तुटक्या कचराकुंडय़ा, राडय़ारोडय़ांचे ढीग, अस्वच्छ नदीपात्र, सार्वजनिक इमारती आणि कार्यालयांमधील कमालीची अस्वच्छता, भिंतीवरील पिचकाऱ्या, मोकाट श्वानांच्या टोळ्या हे स्वच्छ आणि सुंदर पुण्यातील तसेच स्मार्ट सिटीतील हे चित्र शहर स्वच्छतेची वस्तुस्थिती स्पष्ट करणारे आहे.