News Flash

“…तर आम्हा तिघांची आत्महत्या सरकारला पाहावी लागेल”, स्वप्नील लोणकरच्या आईचा आक्रोश!

एमपीएससीची मुलाखत २ वर्ष लांबल्यानंतर नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची आज प्रविण दरेकरांनी भेट घेतली.

swapnil lonkar suicide case
स्वप्नील लोणकरच्या आईचा संतप्त आक्रोश!

MPSC ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील दोन वर्षांपासून मुलाखतच न झाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्यानंतर राज्य सरकारने ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व प्रलंबित जागा भरण्याचा निर्णय विधानसभेमध्ये जाहीर केला. मात्र, एकीकडे जागा भरण्याचा निर्णय झालेला असताना दुसरीकडे स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला अद्याप कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. त्यामुळे अधिकारी होऊन संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलण्याच्या उंबरठ्यावर असणारा मुलगा गमावल्यामुळे स्वप्नीलचे आई-वडील आणि कुटुंबीय उद्विग्न भावना व्यक्त करत आहेत.

अजून किती मुलं जाण्याची सरकार वाट बघतंय?

महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज पुण्यात स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी प्रविण दरेकरांशी बोलताना या कुटुंबानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी स्वप्नीलच्या आईला अश्रू अनावर झाले. “अजून किती मुलं जाण्याची सरकार वाट बघतंय”, असा जळजळीत सवाल स्वप्नीलच्या आई छाया लोणकर यांनी सरकारला विचारला आहे.

फक्त भेटून जातात, आश्वासनं देतात!

यावेळी छाया लोणकर यांनी सरकारी कारभार आणि नेतेमंडळींच्या भेटीगाठीवर देखील तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “१५ दिवस झाले. फक्त येऊन भेटून जातात. प्रत्येक जण आश्वासन देऊन जातात. सरकारनं ठाम सांगावं की आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही. दोन महिन्यांनी सरकार कुणाचं का असेना, सरकारला आमच्या तिघांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील. आमच्या पोटचा गोळा गेला. आम्ही त्याला कसं शिकवलं आमचं आम्हाला माहिती. यांनी थोडे निर्णय आधीच घ्यायला हवे होते. दोन दोन वर्ष निर्णय लांबवले. करोना काळात दोन दोन महिने फक्त लॉकडाउन केलं होतं. बाकीचं सगळं चालूच होतं”, असं छाया लोणकर म्हणाल्या आहेत.

Video : “…पण आता आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये”; स्वप्निलची इच्छा राहिली अपूर्णच

स्वप्नीलचं मन हेलावून टाकणारं पत्र

३० जून रोजी पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय तरुणानं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं प्रत्येकाचंच मन हेलावून टाकेल अशी चिठ्ठी लिहून एमपीएससी आणि सरकारच्या कारभाराचं विदारक चित्रच सगळ्यांसमोर आणलं. “MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता”, असं स्वप्नीलनं या पत्रात म्हटलं आहे.

हा माझा तळतळाट… एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी; स्वप्निलच्या आईचा आक्रोश

पावसाळी अधिवेशनात सरकारची मोठी घोषणा

या प्रकरणानंतर राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३१ जुलैपर्यंत एमपीएसचीमार्फत पदभरती करण्याची घोषणा सरकारने केली. त्यापाठोपाठ एमपीएससी बोर्डाच्या सदस्यांची संख्या ६ वरून १२ करण्याचं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात जाहीर केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2021 8:42 pm

Web Title: swapnil lonkar suicide case pravin darekar visits familt members of swapnil lonkar svk 88 pmw 88
टॅग : Mpsc,Mpsc Exams
Next Stories
1 पुणे : गुण वाढवून देतो सांगत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; तोंडाला काळं फासून काढली शिक्षकाची धिंड!
2 पुणेः बस स्टॉपवर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून
3 प्राध्यापकाच्या आत्महत्येनं पुणे हादरलं! फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ लिहित मृत्यूला कवटाळलं