‘एक झोका एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’ अशा आशयघन गीतांना आपल्या स्वरसाजाने अजरामर करणारे प्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांच्या वापरातील रेकॉर्ड प्लेअर, त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील पुस्तके, ध्वनिमुद्रिका आणि सीडी असा अनोखा संग्रह स्वर-ताल साधना संस्थेच्या ग्रंथालयाकडे सुपूर्द करण्यात आला. संस्थेच्या आनंद मोडक संगीत अभ्यासिकेमध्ये ठेवण्यात आलेल्या या संग्रहाचा लाभ रसिकांना घेता येणार आहे.
संगीत या समान धाग्यातून प्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांचा संस्थेशी ऋणानुबंध जुळला. संस्थेमध्ये होत असलेल्या छोटेखानी सांगीतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी हा स्नेह जपला. संस्थेचे काम पाहून माझ्या संग्रहातील संगीताचा वारसा जतन करण्यासाठी स्वर-ताल साधना संस्थेकडे देणार असल्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला होता, अशी माहिती संस्थेचे संस्थापक आणि प्रसिद्ध तबलावादक संजय करंदीकर यांनी दिली. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर रागिणी मोडक यांनी हा संग्रह संस्थेकडे सुपूर्द करून मोडक यांची इच्छा पूर्ण केली. मोडक यांच्या वापरातील दुर्मीळ रेकॉर्ड प्लेअर, ध्वनिमुद्रिका आणि सीडी, त्याचप्रमाणे पुस्तकांचा संग्रह संस्थेच्या आनंद मोडक संगीत अभ्यासिकेमध्ये दाखल झाला आहे, असेही करंदीकर यांनी सांगितले. आनंद गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या स्वर-ताल साधना या संगीत शिक्षण देणाऱ्या संस्थेची स्थापना १६ डिसेंबर १९९३ रोजी प्रसिद्ध गायिका पौर्णिमा तळवलकर आणि ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांच्या हस्ते झाली होती. पाच वर्षांपासून ते ७५ वर्षे अशा विविध वयोगटातील अडीचशेहून अधिक विद्यार्थी संगीत शिक्षण घेत आहेत.
‘थिएटर अॅकॅडमी’च्या ‘घाशीराम कोतवाल’ नाटकासाठी झालेल्या परदेश दौऱ्यांमध्ये आनंद मोडक यांनी संग्रह केलेल्या रेकॉर्ड्सचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्या संग्रहातील सातशे ध्वनिमुद्रिकांमध्ये शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपटसंगीत, लोकसंगीत यांसह वेगवेगळ्या पाश्चात्त्य संगीत प्रवाहांचा अंतर्भाव आहे. दोनशेहून अधिक सीडी आणि डीव्हीडींचा समावेश आहे. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या ‘स्वरार्थरमणी’ या पुस्तकासह सलील चौधरी, महंमद रफी, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, किशोरकुमार यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर प्रकाश टाकणाऱ्या सुमारे पाचशे पुस्तकांचा समावेश आहे. मोडक यांनी संगीतबद्ध केलेल्या काही चित्रपटांच्या संहिताही आहेत. या संहितांमध्ये मोडक यांनी शोधलेल्या संगीताच्या जागांसंबंधीच्या खुणाही दिसतात. आनंद मोडक यांचे संगीत या विषयावर पीएच. डी. करू इच्छिणाऱ्याला अभ्यासासाठी सामग्री येथे उपलब्ध झाली असल्याचेही करंदीकर यांनी सांगितले.

मोडक कुटुंबीयांचा मोठेपणा
आनंद मोडक यांचा हा अमूल्य खजिना स्वर-ताल साधना संस्थेला मिळाला याचा आनंद आहे. या ऋणातून उतराई कसे व्हावे हे कळेना. एक धनादेश मी रागिणी मोडक यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, ‘हा धनादेश आम्ही बँकेत भरणार नाही आणि तुम्हाला परत करणार नाही’, असे सांगून मोडक कुटुंबीयांनी मनाचा मोठेपणा दाखवून दिला आणि संस्थेच्या कार्याविषयीची कृतज्ञताही व्यक्त केली, असे संजय करंदीकर यांनी सांगितले.