शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक अतिक्रमणमुक्त करण्याची कारवाई महापालिकेने हाती घेतली असून जेधे चौक (स्वारगेट) परिसरातील बत्तीस स्टॉल सोमवारी हटवण्यात आले. कोथरूडमधील मयूर कॉलनीतही आठ स्टॉलवर कारवाई करण्यात आली असून सिंहगड रस्ता परिसरातही कारवाई करून पंचवीस हजार चौरस फूट जागा सोमवारी मोकळी करण्यात आली.
 स्वारगेट येथे जेधे चौकात उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. जेधे चौकात अद्याप या कामाला सुरुवात झाली नसली, तरी रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुलाचे काम सुरू झाल्यानंतर त्यात अडथळा येऊ नये यासाठी या भागातील बत्तीस स्टॉल सोमवारी हटवण्यात आले. यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई करून शनिवारी काही स्टॉल मागे हटवण्यात आले होते. एसटी स्थानकापासून शंभर मीटर अंतरात कोणतेही स्टॉल असू नयेत, असा नियम असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.
कोथरूडमधील मयूर कॉलनीतील आठ स्टॉलही हटवण्यात आले. तसेच कोंढवा परिसरातही कारवाई करून हॉटेल चालकांनी केलेले अतिक्रमण सोमवारी हटवण्यात आले. या कारवाईत अडीच हजार चौरस फुटांचे बांधकाम हटवण्यात आले.
सिंहगड रस्त्यावर आंबेगाव परिसरात सेवा रस्ता तयार करण्यात येणार असून त्यासाठी पंचवीस हजार चौरस फूट जागा सोमवारी मोकळी करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.