थंडीची चाहूल लागली की पुणेकरांना स्वेटर, कानटोप्या, मफलर, जर्किन आणि शाली या गरम कपडय़ांची आठवण होते आणि त्यांची पावले आपसूकच वळतात ती लक्ष्मी रस्त्यावरील स्वेटर विक्रेत्यांकडे. गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून ही मंडळी पुण्यात स्वेटर विक्रीचा व्यवसाय करत आहेत. या व्यावसायिकांशी गप्पा मारताना ही मंडळी आता पुणेकरच झाली असल्याचे ठळकपणे लक्षात येते.
गेल्या सतरा वर्षांपासून पुण्यात स्वेटर विक्रीचा व्यवसाय करणारे अनिल थापा म्हणाले, ‘सतरा वर्षांपासून पुण्यात येऊन हा व्यवसाय करत आहे. माझ्या आई-वडिलांबरोबर मी पुण्यात आलो, माझे लहानपण पुण्यातच गेले. आता तर पुणे हेच माझे गाव आहे.’ नेपाळमधील सुरकेत हे थापा यांचे मूळ गाव. त्यांना भाषेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, भाषेची अडचण कधीच आली नाही, कारण नेपाळी आणि हिंदी भाषेत फारसा फरक नाही. आता मला थोडीफार मराठीसुद्धा बोलता येते. पुण्यातला गणेशोत्सव मला विशेष आवडतो. मी दरवर्षी मिरवणुकीत आवर्जून सहभागी होत असतो. त्यांच्या गावाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, गावाला माझी शेती आहे, पुण्यातले काम संपल्यानंतर तीन ते चार महिने मी गावाकडे जाऊन शेती करतो. बाळासाहेब ठाकरे यांचा अंगरक्षक हा देखील अनिल थापा यांच्याच गावचा. त्याच्या मदतीने काम शोधायला काहीच त्रास झाला नाही.
खरे तर पूर्वी ही मंडळी फक्त स्वेटरच विकत असत. त्यामुळे थंडीचे तीन महिनेच ते पुण्यात राहात. मात्र त्यानंतर गरम कपडय़ांसोबतच रेनकोट, पावसाळी कपडेही हे लोक विकू लागले. त्यामुळे आता ही मंडळी वर्षभर पुण्यातच राहतात.
कर्नाटकातील हुबळीचे असलेले शिवा हे आणखी एक विक्रेते. ते दहा वर्षांपासून पुण्यातच आहेत. आठ महिने व्यवसाय करतात आणि उन्हाळ्यात त्यांच्या गावाला जातात. तरी पण ते म्हणतात की आता मला पुणेच जास्त आवडते. मी पहिल्यांदा पुण्यात आलो तेव्हा मला हिंदीही येत नव्हती. तेव्हा कन्नड भाषेतून संवाद साधायला अवघड जात असे. पण लवकरच मी हिंदी, तिबेटी आणि मराठी भाषा शिकून घेतली. मी पुण्याबाहेरचा आहे असे मला कधीच वाटत नाही.
ही मंडळी स्वेटर, कानटोप्या, शाली, मफलर आदी पारंपरिक कपडय़ांबरोबरच आता आधुनिक पद्धतीचे गरम कपडेही विकतात. हा सर्व माल मुख्यत्वे पंजाबमधील लुधियाना येथून आणला जातो. त्याशिवाय शिलाँग आणि नेपाळमधूनही माल आणला जातो. मात्र नेपाळमधून माल आणताना कर जास्त लागत असल्याने तेथून माल कमी प्रमाणात मागवला जातो. या ठिकाणी मिळणाऱ्या स्वेटर आदींची किंमत पाचशे ते पंधराशे रुपये एवढी आहे. लोक किमतींबाबत खूप घासाघीस करत असल्याचे अनिल थापा म्हणाले.
तिबेटचे असलेले तेनझिंग यांचा जन्मच पुण्यातला आहे. आता मी पुण्यातच स्थायीक झालो आहे. माझे संपूर्ण कुटुंबही पुण्यातच आहे. त्यामुळे मी आता पक्का पुणेकर झालो आहे. मी वर्षभर कपडय़ांचाच व्यवसाय करतो. उन्हाळ्यात मी टी शर्ट विक्रीचा व्यवसाय करतो, असे तेनझिंग म्हणाले. त्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला पोलीस आणि महानगरपालिकेकडून पूर्ण सहकार्य मिळते. आमच्या प्रत्येकाकडे व्यवसायाचा परवाना आहे. त्यामुळे विशेष अडचणी येत नाहीत. क्वचित कधीतरी येणारे खराब अनुभव सोडल्यास आम्ही पुण्यात अगदी खूष आहोत.