राजस्थानातील गोड गाजरांचा हंगाम सुरू

थंडीला सुरुवात झाली की राजस्थानातील गाजरांची आवक पुण्यातील घाऊक बाजारात सुरू होते. थंडीत खास गाजर हलवा तयार केला जातो. मिठाई व्यावसायिक तसेच गृहिणींकडून गाजरांना विशेष मागणी असते. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात राजस्थानातील गाजरांची आवक सुरू झाली आहे.

राजस्थानातील लालचुटूक गाजरांची गोडीही चांगली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात तेरा टन गाजरांची आवक दोन दिवसांपूर्वी झाली. घाऊक बाजारात दहा किलो गाजरांना ३०० ते ३२० रुपये असा दर मिळाला आहे. सध्या बाजारात दाखल होत असलेल्या राजस्थानातील गाजरांची प्रतवारी चांगली आहे. थंडी सुरू झाली की दरवर्षी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात राजस्थानातून गाजरांची आवक  होते.  जून ते सप्टेंबर दरम्यान इंदूर भागातील गाजरांची आवक सुरू राहते. राजस्थानातील गाजरांचा हंगाम साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. एप्रिल महिन्यापर्यंत हंगाम सुरू राहतो. साधारणपणे एक महिन्यापूर्वी इंदूरमधील गाजरांचा हंगाम संपला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी राजस्थानातील जोधपूर भागातून गाजरांची आवक सुरू झाली. एप्रिल महिन्यापर्यंत ही आवक सुरू राहणार आहे.

गावरान गाजरांची आवक एप्रिलमध्ये

महाराष्ट्रातील गाजरांचा हंगाम साधारणपणे एप्रिल महिन्यात सुरू होतो. मे अखेरीस राज्यातील गाजरांचा हंगाम संपतो. त्यानंतर इंदूर भागातील गाजरे बाजारात दाखल होतात. इंदूरमधील गाजरांची साठवणूक शीतगृहात करण्यात आलेली असते. त्यामुळे मागणीनुसार इंदूर भागातील गाजरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. राजस्थानातील गाजरे काढणी केल्यानंतर लगोलग बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतात. त्यामुळे राजस्थानातील गाजरे चवीला गोड असल्यामुळे गाजर हलव्यासाठी या गाजरांना चांगली मागणी असते. महाराष्ट्रातील गावरान गाजरांची चव तुरट असते. मार्केट यार्डातून गोवा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथे गाजरे विक्रीसाठी पाठविण्यात येतात.

किरकोळ बाजारात गाजरांना चांगली मागणी आहे. राजस्थानातील गाजरांची प्रतिकिलो ७० ते ८० रुपये दराने विक्री केली जात आहे, असे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

जोधपूरमध्ये सर्वाधिक पीक

राजस्थानातील जोधपूर भागातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर गाजरांची लागवड करतात. गाजराची लागवड रेताड जमिनीत केली जाते. साधारपणे वर्षभर गाजरे विक्रीसाठी उपलब्ध असतात, पण राजस्थानातील गाजरे चवीला गोड असतात. उपाहारगृह, खानावळ चालक तसेच गृहिणींकडून चवीला गोड असणाऱ्या गाजरांना मोठी मागणी असते. किरकोळ विक्रेत्यांकडून गाजरांना मागणी वाढली असून, पुढील आठवडय़ात गाजरांची आवक आणखी वाढेल, असे गाजराचे व्यापारी समीर आखाडे यांनी सांगितले.