पोषक हवामानामुळे उत्पादन आणि गोडीही चांगली

पुणे : गोड चवीच्या नागपूर संत्र्यांचा हंगाम सुरू झाला असून श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात नागपूर संत्र्यांची आवक सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी पोषक हवामानामुळे नागपूर संत्र्यांची प्रतवारी चांगली आहे तसेच संत्र्यांची गोडी वाढली आहे.

मार्केट यार्डातील फळबाजारात नागपूर येथून दररोज आठ ते दहा टन संत्र्यांची आवक होत आहे. नागपूर परिसरातील परतवाडा, वरूड, चिखली, अंजनगाव, अचलपूर येथून संत्र्यांची आवक होत आहे. घाऊक बाजारात रंग, आकार  तसेच प्रतवारीनुसार आठ ते दहा डझन मोठ्या संत्र्यांना ७०० ते ८०० रुपये असा भाव मिळाला आहे. लहान आकाराच्या अकरा ते बारा डझन संत्र्यांना ६०० ते ७०० रुपये असा भाव मिळाला आहे. तर चौदा डझन संत्र्यांना ५०० रुपये असा भाव  मिळाला आहे.  किरकोळ बाजारात एक किलो संत्र्यांची विक्री ७० ते ९० रुपये या भावाने केली जात आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील संत्रा व्यापारी करण जाधव यांनी दिली.

हंगामाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर संत्र्यांची चव आंबट गोड असते. यंदा पाऊस चांगला झाला आहे. पोषक हवामानामुळे गोडी आणि प्रतवारी चांगली आहे. पुण्यातील घाऊक फळबाजारातून उपनगर, जिल्हा, हुबळी, निपाणी, धारवाड येथे संत्री विक्रीस पाठविली जात आहेत. यंदा संत्र्यांचे उत्पादन वाढले आहे. आठ दिवसांपासून बाजारात नागपूर संत्र्यांची नियमित आवक सुरू झाली आहे. संत्र्यांचा हंगाम जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. संत्र्यांना फारशी मागणी नसल्याने दर आवाक्यात आहे. येत्या काही दिवसांत परराज्यातून नागपूर संत्र्यांना मागणी वाढेल, असे जाधव यांनी सांगितले.