घाऊक बाजारात रताळय़ाला १८ ते २२ रुपये, तर कवठाला शेकडय़ासाठी १०० ते ८०० रुपये दर

महाशिवरात्रीनिमित्त रताळी आणि कवठांची मोठी आवक घाऊक बाजारात झाली. आवक वाढल्याने रताळ्याचे दर उतरले आहेत. चांगल्या प्रतीच्या रताळय़ाला घाऊक बाजारात प्रतिकिलो १८ ते २२ रुपये असा दर मिळाला. कवठाला शेकडय़ासाठी १०० ते ८०० रुपये असा दर मिळाला.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात राज्य तसेच परराज्यातून  रताळय़ाची मोठी आवक झाली. कर्नाटकातील म्हैसूर, बेळगाव,आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील बीड, कराड, करमाळा, राशीन भागातून ६० ते ७० ट्रक रताळय़ाची आवक झाली. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने रताळय़ाच्या उत्पादनासाठी पोषक वातावरण होते.

बेळगाव येथून रताळय़ाची सर्वाधिक आवक झाली. कराड येथील रताळय़ाचा रंग गुलाबी असून त्याची प्रत चांगली आहे. कराड येथील रताळय़ाला ग्राहकांकडून चांगली मागणी असून प्रतिकिलो रताळय़ाला १८ ते २२ रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती अरुण गुलाबराव भोसले फर्मचे सोमनाथ भोसले यांनी दिली.

कर्नाटक तसेच बेळगाव परिसरातून रताळय़ाची मोठी आवक झाली आहे. या रताळय़ाची प्रतवारी तितकी चांगली नाही. कर्नाटकातील रताळी चवीला तुरट आहेत. त्यामुळे या रताळय़ांना मागणी कमी आहे. कर्नाटकातील रताळय़ाला दहा किलोमागे ८० ते ११० रुपये असा भाव मिळाला.

बीड भागातील रताळय़ाला १४० ते १६० रुपये असा भाव मिळाला. कराड भागातील रताळय़ाला १८० ते २२० रुपये असा भाव मिळाला आहे.

पुणे जिल्हय़ातील  नारायणगाव, मंचर तसेच कोल्हापूर, मिरज, सांगली,अंजनी, नगर येथील उपबाजारात रताळय़ाची चांगली आवक झाली. त्यामुळे घाऊक बाजारातून अन्य शहरांत रताळी विक्रीसाठी पाठविण्यात आली नाहीत, असे भोसले यांनी सांगितले.

 

किरकोळ बाजारात चांगली मागणी

शिवरात्रीच्या उपवासासाठी रताळय़ाचे काप करून ते साखरेच्या पाकात घालून त्यापासून गोड पदार्थ तयार केला जातो. किरकोळ बाजारात रताळय़ाची मोठी आवक झाली. रताळय़ाला चांगली मागणी असल्याचे किरकोळ बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले. किरकोळ बाजारात प्रतिकिलो रताळय़ाची विक्री ३० ते ३५ रुपये किलो दराने करण्यात आली.