पुण्यात राजगुरु नगर येथे रहाणाऱ्या निलेश राळे या २५ वर्षीय युवकाला दिवाळीत जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे पक्षाघाताचा झटका आला होता. सुदैवाने वेळीच योग्य उपचार मिळाल्यामुळे निलेश आता बरा झाला आहे. पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार आपल्याला हायपोकालीमिक पीरियॉडिक पॅरलॅसिस (हायपोपीपी) हा आजार आहे याची निलेशला पूर्ण कल्पना होती. या आजारामध्ये गोड खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागते. निलेशला गोड पदार्थ प्रचंड आवडतात. दिवाळीत तो गोड खाण्यावर नियंत्रण ठेऊ शकला नाही. परिणामी पक्षाघाताच्या झटक्याने त्याला त्याची किंमत चुकवावी लागली.

हायपोपीपी या आजारामध्ये जास्त गोड पदार्थ खाल्ल्यास शरीरातील पोटॅशिअमची पातळी कमी होते. त्यामुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. या आजाराचा सामना करणाऱ्या अनेक रुग्णांना कार्बोहायड्रेट असणाऱ्या गोड पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे याची कल्पनाच नसते असे डॉक्टरांनी सांगितले. हायपोपीपी या आजारामध्ये शरीरातील स्नायू कमकुवत होतात.

७ नोव्हेंबरला संध्याकाळी निलेश त्याच्या बहिणीला सोडण्यासाठी गेला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास गाडी चालवत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. शरीरातून ऊर्जा संपत चालल्यामुळे आपण कमकुवत होतोय हे त्याला जाणवले. शरीरात नेमके काय बदल घडतायत ते त्याच्या लक्षात येत नव्हते. पक्षाघाताची लक्षणे दिसू लागताच त्याने जवळच्या रुग्णालयाजवळ गाडी थांबवली.

त्या रुग्णालयातून त्याला राजगुरु नगर येथील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तिथेही उपचारांची योग्य सुविधा नसल्यामुळे त्याला साईनाथ रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तिथे निलेशचे एक्स-रे काढले. एमआरआय स्कॅन केले. पण तिथल्या डॉक्टरांना आजाराचे नेमके निदान करता येत नव्हते. १२ तासानंतरही निलेशच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसत नसल्याने अखेर त्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला व निलेशला जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तिथे डॉक्टर नसली यांनी निलेशचे सगळे जुने रिपोर्ट तपासले व त्याची इसीजी आणि ब्लड टेस्ट केली. त्यामध्ये त्याच्या शरीरातील पोटॅशिअमची पातळी घसरल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबियांकडे अधिक चौकशी केली असता त्याला हायपोपीपी असल्याचे समजले. त्यानंतर आयव्ही आणि तोंडावाटे पोटॅशिअमचे डोस देण्यात आले. आठ तासातच निलेशच्या प्रकृतीत फरक दिसू लागला.

निलेशच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्यानंतर दोन दिवसांनी १० नोव्हेंबरला त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मानवी शरीरातील स्नायूंना पोटॅशिअम मार्फत ऊर्जा मिळते. एचपीपीच्या रुग्णांच्या बाबतीत शरीरातील पोटॅशिअम कमी झाल्यानंतर स्नायू कमकुवत होतात. शरीरात एक प्रकारची दुर्बलता येते. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांनी गोड खाणे टाळले पाहिजे.