खोटी माहिती भरून जलतरण तलावाच्या देखभाल दुरुस्तीचे काम मिळवू पाहणाऱ्या संस्थांचा बनाव पिंपरी पालिकेच्या क्रीडा समितीचे सदस्य व अधिकाऱ्यांनी उघड केला. त्यामुळे त्या संस्थांना काम देण्याचा प्रस्ताव ऐन वेळी मागे घेण्याची वेळ आयुक्तांवर आली.
पालिकेच्या जलतरण तलावांच्या देखभाल व दुरुस्तीचा विषय क्रीडा समितीपुढे मंजुरीसाठी होता. या संदर्भात निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्रांची तपासणी करावी, त्यानंतर निर्णय घ्यावा म्हणून समितीने विषय तहकूब ठेवला होता. दरम्यान, या कामाशी संबंधित तीनही ठेकेदारांच्या अनुभव दाखल्यांमध्ये खोटी माहिती असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. झाडू मारण्याचे काम करणाऱ्या संस्थेने जलतरण तलावासाठी निविदा भरली होती. त्याचप्रमाणे, ज्या भागात तलावच नाही, तेथील अनुभवाचे दाखले जोडण्याची ‘किमया’ केली होती. क्रीडा समितीचे सभापती जितेंद्र ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत याचे पडसाद उमटले. सुरेश म्हेत्रे, नीलेश बारणे, किरण मोटे या सदस्यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. संबंधितांची अनामत रक्कम जप्त करावी, त्यांना काळ्या यादीत टाकावे आणि पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. 
तलावांचा कारभार ‘कॅशलेस’ करावा
जलतरण तलावाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तलावांचा कारभार कॅशलेस करावा, अशी मागणी सदस्यांनी बैठकीत केली. तलावावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली झाल्यास राजकीय दबाव आणून ते पुन्हा तेथे येऊ पाहतात. काहीही करून पुन्हा नियुक्ती मिळवली जाते, हे कशाचे द्योतक आहे, असा मुद्दा उपस्थित करत हे संगनमत मोडीत काढण्याची गरज सदस्यांनी व्यक्त केली.