स्वाईन फ्लूच्या दृष्टीने ऑगस्ट महिना राज्यासाठी त्रासाचा ठरल्याच्या पाश्र्वभूमीवर आता सप्टेंबरमध्येही स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कायम आहे. चालू महिन्यात पहिल्या १३ दिवसांत केवळ पुण्यात स्वाईन फ्लूमुळे १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यातील ३ रुग्ण पुण्यातले होते, तर इतर ७ पुण्याबाहेरून उपचारांसाठी आले होते. राज्यात स्वाईन फ्लूमुळे कृत्रिम श्वासोछ्वासावर ठेवण्यात आलेल्या रुग्णांची संख्यादेखील पुण्यात सर्वाधिक असून पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये सध्या २७ रुग्णांना कृत्रिम श्वासोछ्वासावर ठेवण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये शहरात स्वाईन फ्लूमुळे ९ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या १० आहे. सध्या शहरात ४४ रुग्ण स्वाईन फ्लूमुळे रुग्णालयात दाखल असून यातील २० जणांना कृत्रिम श्वासोछ्वासावर ठेवण्यात आले आहे. याशिवाय आणखी एका संशयित रुग्णालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यात जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे ११० मृत्यू झाले असून त्यातील ४० जण पुण्यात राहणारे होते, तर ७० रुग्ण बाहेरून उपचारांसाठी आले होते.
स्वाईन फ्लूच्या उपचारांदरम्यान कृत्रिम श्वासोछ्वासावर ठेवावे लागलेल्या रुग्णांची संख्याही राज्यात पुण्यातच सर्वाधिक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या स्वाईन फ्लूमुळे राज्यात एकूण ४४४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून त्यातील कृत्रिम श्वासोछ्वासावर ठेवलेल्या रुग्णांची संख्या ३६ आहे. या ३६ रुग्णांपैकी २० रुग्ण पुणे मनपा क्षेत्रात, ६ जण पिंपरी- चिंचवडमध्ये, तर एक रुग्ण ससूनमध्ये उपचार घेणारा आहे.