‘जागतिक स्तरावर टॅमी फ्लू या औषधाला असलेला प्रतिरोध कमी असून हे प्रमाण मोठय़ा माणसांमध्ये ०.४ टक्के आणि लहान मुलांमध्ये ५.४ टक्के असल्याचे काही वैद्यकीय अभ्यासांमध्ये दिसून आले आहे,’ अशी माहिती ‘रोश’ या ‘टॅमी फ्लू’ उत्पादक कंपनीने दिली आहे.
स्वाईन फ्लूच्या उपचारांमध्ये वापरले जाणारे ‘ऑसेलटॅमीविर’ हे औषध ‘टॅमी फ्लू’ या ‘ब्रँड’ नावाने ओळखले जाते. हे औषध बनवणाऱ्या कंपन्यांपैकी रोश ही एक कंपनी आहे. या औषधाला असलेला प्रतिरोध वाढण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने या कंपनीशी संपर्क साधला. कंपनीने आपल्या उत्तरात म्हटल्यानुसार,‘२००९ मध्ये आलेल्या स्वाईन फ्लूच्या साथीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे टॅमी फ्लू पुरेसे परिणामकारक औषध असून त्यामुळे स्वाईन फ्लू रुग्णांमध्ये निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा धोका कमी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. जागतिक स्तरावर टॅमी फ्लूला असलेल्या प्रतिरोधाचे प्रमाण कमी आहे. वैद्यकीय अभ्यासानुसार हा प्रतिरोधाचा दर मोठय़ा माणसांमध्ये ०.४ टक्के व लहान मुलांमध्ये ५.४ टक्के असल्याचे दिसून आले आहे. कंपनीच्या दृष्टीने टॅमी फ्लूला असलेल्या प्रतिरोधाचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यावर नजर ठेवण्यासाठी आम्ही विविध जागतिक संस्थांची मदत घेत आहोत.’
सध्या कंपनीतर्फे ‘ह्य़ूमन मोनोक्लोनल अँटीबॉडी’ हे औषध बनवण्यात येत असल्याची माहिती कंपनीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागाच्या सहयोगी संचालक शिल्पिका दास यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘हा प्रकल्प सध्या ‘क्लिनिकल फेज’मध्ये आहे. विषाणूच्या विविध प्रकारांना (स्ट्रेन्स) निष्प्रभ करणे हे या औषधाचे काम असेल. या स्ट्रेन्समध्ये ‘ए- एच १ एन १’चाही समावेश असेल.’’
पुण्यात स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू
पुण्यात मंगळवारी स्वाईन फ्लूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ६१ झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने पुरवलेल्या आकडेवारीनुसार सध्या पुण्यात ७९ स्वाईन फ्लू रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यातील २० जणांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. आणखी १८ स्वाईन फ्लूचे संशयित रुग्णही रुग्णालयात दाखल आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात स्वाईन फ्लूचे ६८९ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ५५० रुग्ण पूर्णत: बरे होऊन घरी गेले आहेत.