सरसकट सर्वानी स्वाइन फ्लूची लस घेणे गरजेचे नसले, तरी गरोदर स्त्रिया, केमोथेरपी सुरू असलेले कर्करुग्ण, प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण, ५० वयाच्या वरील लोक, मधुमेही, फुफ्फुस, हृदय किंवा मूत्रपिंडाचा ‘क्रॉनिक’ आजार असलेले रुग्ण आणि अति लठ्ठपणा असलेल्यांनी स्वाइन फ्लूची लस घेतलेली चांगली, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
‘क्रॉनिक’ आजार असलेल्या रुग्णांना ठरावीक दिवसांनी त्यांच्या डॉक्टरांकडे जावे लागते. अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी, असे मत संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे यांनी व्यक्त केले. स्वाइन फ्लूच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल ते म्हणाले, ‘बाह्य़रुग्ण विभागात फ्लूसदृश लक्षणे घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत खोकला, ताप, घसादुखी, सर्दी, नाकातून पाणी येणे ही लक्षणे असलेले रुग्ण वाढले आहेत. स्वाइन फ्लूला सुरुवात झाली असली, तरी खासगी रुग्णालयात सध्या दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या तुरळक आहे. फेब्रुवारीत याहून खूप मोठय़ा संख्येने रुग्ण दाखल होते. रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे दाखल होणाऱ्या जवळपास सर्व रुग्णांना ताप व खोकला दिसतो आहे. तसेच सर्दी, नाकातून पाणी येणे, घसा दुखणे, घसा खवखवणे, अंगदुखी, स्नायूदुखी ही लक्षणे प्रामुख्याने दिसत आहेत. काही रुग्णांना पाण्यासारखे पातळ जुलाब होण्याचे लक्षण देखील दिसत आहे.’
टोचून घेण्याची व नाकात टाकण्याची लस सारख्याच प्रमाणात परिणामकारक आहे, परंतु गरोदर स्त्रिया व प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी टोचून घेण्याची लस घ्यावी. २ ते ५० या वयोगटातील रुग्णांनी नाकात टाकण्याची लस घेतली तरी चालते. दोन्ही लशींचा परिणाम लस घेतल्यानंतर १५ दिवसांत दिसू लागतो व साधारणपणे एक वर्षांपर्यंत टिकतो. ‘स्वाइन फ्लूच्या लशी ७० ते ८० टक्के परिणामकारण आहेत, पण म्हणून गाफील राहू नये. स्वाइन फ्लूसदृश लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबतचे नियम पाळणे आवश्यकच आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

गरोदर स्त्रियांना शासनातर्फे मोफत लस देण्यास सुरुवात
शासनातर्फे गरोदरपणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत असलेल्या स्त्रियांना स्वाइन फ्लूची इंजेक्टेबल लस मोफत देण्यास सुरुवात झाली आहे. औंधच्या जिल्हा रुग्णालयात सोमवार ते शनिवार दररोज ही लस उपलब्ध आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख म्हणाले, ‘सुरुवातीला केवळ गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत असलेल्या स्त्रियांना लस देण्याचे ठरवण्यात आले होते मात्र आता गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत देखील लस देत आहोत. ही लस मोफत व ऐच्छिक आहे. रुग्णालयातील स्त्रीरोगाच्या बाह्य़रुग्ण विभागात सुविधा उपलब्ध आहे. आधी गरोदर स्त्रीची नोंदणी करून घेतली जाते व लस टोचल्यावर सुरक्षितता म्हणून तिला १०-१५ मिनिटे तिथेच थांबवून ठेवून नंतर घरी सोडले जाते.’
शहरात स्वाइन फ्लूचे ११ रुग्ण
पालिकेच्या आरोग्य विभागाने पुरवलेल्या माहितीनुसार शहरात स्वाइन फ्लूचे ११ रुग्ण सापडले असून त्यातील ६ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे, तर ५ रुग्ण वॉर्डात उपचार घेत आहेत. आणखी २ स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण देखील आढळले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूच्या ८४२ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ९३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ७३९ रुग्ण पूर्णत: बरे होऊन घरी गेले.