शहरातील स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव एप्रिलपासून हळूहळू कमी होताना दिसतो आहे. रोज नव्याने आढळणाऱ्या स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येबरोबरच स्वाइन फ्लू उपचारांसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही घटते आहे. आता जुलै- ऑगस्टमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असून यंदा स्वाइन फ्लू हाताळण्यात केवळ ‘गोळ्या वाटप’ करण्याची भूमिका वठवलेला पालिकेचा आरोग्य विभाग काही ठोस धोरणे राबवणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एप्रिल महिन्यातील पहिल्या तेरा दिवसांत शहरात स्वाइन फ्लूचे २८ नवीन रुग्ण सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूचा उपद्रव जोरात असताना शहरात प्रतिदिवशी इतके रुग्ण आढळत होते. सध्या २० स्वाइन फ्लू रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असून आणखी ३ संशयित स्वाइन फ्लू रुग्णही रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ८ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. चालू महिन्यात सहा रुग्णांचा शहरात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
यंदा पुण्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा भरणा खासगी रुग्णालयातच दिसला. नायडू रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालय या पालिकेच्या दोनच रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांना दाखल करून घेण्याची सोय असूनही या दोन्ही रुग्णालयात २००९ पासून व्हेंटिलेटरची सुविधा सुरू करणे पालिकेस शक्य न झाल्यामुळे गरीब रुग्णांनाही ससून किंवा खासगी रुग्णालयात दाखल होण्याखेरीज पर्याय उरला नाही. रुग्णांना ऑसेलटॅमीविरच्या (टॅमी फ्लू) गोळ्या वाटणे हाच प्रमुख कार्यक्रम राबवणाऱ्या पालिकेने या गोळ्यादेखील शहरातील सर्व रुग्णालयातील रुग्णांना मोफत पुरवल्या नाहीत. पुन्हा जुलै-ऑगस्टमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतरही शहरातील स्वाइन फ्लू उपचारांचे चित्र असेच राहणार का, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.  
स्वाइन फ्लूसंबंधीच्या धोरणाबद्दल आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी म्हणाले, ‘‘स्वाइन फ्लू हाताळण्यासाठी आमची तयारी होती, परंतु हवामानबदलामुळे समस्या निर्माण झाल्या. कमला नेहरु रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी १० खाटांचा अतिदक्षता विभाग असून ३ व्हेंटिलेटर आहेत. परंतु तिथे मनुष्यबळ उपलब्ध न होण्याचा प्रश्न कायम आहे.’’
‘महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा
राज्याच्या आरोग्य विभागाशी समन्वय हवा’
राज्याच्या आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूबद्दल निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन केली असून एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात या समितीची बैठक होणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘पन्नास टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते. महापालिकांतर्फे पुरवल्या जाणाऱ्या आरोग्य व्यवस्था नगर विकास खात्याच्या अंतर्गत येते. राज्याच्या आरोग्य विभागाशी या यंत्रणेचा थेट संबंध नसल्यामुळे समन्वयाच्या काही समस्या निर्माण होतात. हा मुद्दा केवळ स्वाइन फ्लू पुरताच मर्यादित नाही. शहरी लोकसंख्येचा विस्तार खूप मोठा असून त्या सर्वाना आरोग्य सेवा पुरवणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि महापालिकांच्या आरोग्य विभागांनी एका छताखाली काम करण्याची गरज स्वाइन फ्लूमुळे अधोरेखित झाली आहे.’’
लस मे महिन्यात घ्या!
स्वाइन फ्लूची लस मे महिन्यात घेतल्यास चांगले, असा सल्ला रुबी हॉल रुग्णालयातील स्वाइन फ्लू उपचार विभागाच्या प्रमुख डॉ.  प्राची साठे यांनी दिला. त्या म्हणाल्या, ‘‘लस घेण्यासाठी साथ सुरू होण्याची वाट बघू नये, तसेच ही लस दर वर्षी घ्यावी. स्वाइन फ्लू विषाणूच्या स्ट्रेनमध्ये दर वर्षी काही प्रमाणात बदल होऊ शकतो. त्यानुसार नवीन प्रकारच्या लस उपलब्ध होत असतात.’’