नागरिकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत आठजणांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूच्या संशयीत रुग्णांची संख्याही सध्या वाढत आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

पुणे पालिकेच्या कार्यक्षेत्रात ऑगस्टमध्ये आतापर्यंत विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तीन मृतांपैकी दोन महिला शहरातील असून, एक मृत परगावची आहे. हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. यापैकी स्वाईन फ्लूसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षणीय आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात स्वाइन फ्लूचे १६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सहा रुग्ण सामान्य कक्षात, तर  १० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातही स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, एकूण पाचजणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१७ या दरम्यान ६१ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. ऑगस्टमध्ये  गेल्या १२ दिवसात चारजणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यात एका व्यक्तीचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी आकुर्डीतील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५६ वर्षीय इसमाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला.

पिंपरीत प्रशासकीय पातळीवर शांतता

पिंपरी-चिंचवडमध्ये पाचजणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्यानंतरही प्रशासकीय पातळीवर शांतता दिसून येत आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या औषधांचा तुडवडा निर्माण झाल्याचे नुकतेच उघड झाले होते. त्यामुळे शासनाकडून होणाऱ्या औषधांची वाट न पाहता स्वत:च्या पातळीवर औषधे खरेदी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना यासंदर्भात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या!

पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे म्हणाल्या की, पुण्यात तीन महिलांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला किंवा नाही, हे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट होईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ताप, अंगदुखी आणि श्वसन यंत्रणेला त्रास यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास रुग्णांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टॅमिफ्लूसारखे औषधही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे आवश्यक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने राज्याच्या आरोग्य विभागाकडे कॉड्रिव्हेलंट लसीची मागणी केली आहे. काही प्रमाणात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देखील लस खरेदी करण्यात येणार आहे.