पावसाच्या विश्रांतीमुळे विषाणूजन्य आजारांना पोषक वातावरण

पावसाने विश्रांती घेतल्याने विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरातील रस्त्यांवर येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता विषाणूजन्य आजारांचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

शनिवारी दिवसभरामध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या २५९० नवीन रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १०१ रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले. सदतीस रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी बारा रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये शनिवारी दिवसअखेरीस चौपन्न रुग्ण उपचारांसाठी दाखल आहेत.  रविवारी देखील सुमारे दीडशे संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

उत्सवांच्या काळात आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी यांपैकी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. साधा ताप, सर्दी, खोकला या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब असलेले ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुले यांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असल्याने त्यांना डॉक्टरी सल्ल्याने औषधोपचार देण्याची गरज असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले. स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी अत्यावश्यक असलेल्या टॅमिफ्लू औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन डॉ. साबणे यांनी केले आहे.

तापाचे रूपांतर स्वाइन फ्लूमध्ये होऊ नये यासाठी..

  • पुरेशी विश्रांती, पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या.
  • लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
  • हस्तांदोलन करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • ताप आल्यास ४८ तासांच्या आत डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लू घ्या.