साथीच्या रोगांचा फैलाव; ३१ रुग्ण व्हेंटिलेटरवर

शहरात विविध विषाणूजन्य आजारांच्या साथींचा फैलाव वाढत असताना जानेवारीपासून स्वाइन फ्लूच्या दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून ही संख्या स्पष्ट झाली असून या पाश्र्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१८ पासून पंधरा सप्टेंबर २०१८ या कालावधीत स्वाइन फ्लूच्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. चार रुग्ण बाहेरगावचे असून शहरातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या दैनंदिन माहिती अहवालानुसार सुमारे १५५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी पंचवीस रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले असून सहा रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी तीन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी २०१८ पासून सुमारे १७५ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये चोपन्न रुग्ण जनरल वॉर्डमध्ये तर एकतीस रुग्ण हे व्हेंटिलेटर वर दाखल करण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, पावसाने विश्रांती घेतली आणि उन्हाच्या झळा सुरू झाल्याने संमिश्र वातावरण शहरात आहे. हे वातावरण विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी पोषक असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि श्वासोछ्वासाला त्रास होत असलेल्या रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन टॅमिफ्लू हे औषध सुरू करणे आवश्यक असल्याचे डॉ. साबणे यांनी सांगितले.

काळजी घ्या!

  • विषाणूजन्य आजारांनी ग्रस्त असल्यास हस्तांदोलन करू नका.
  • निरोगी व्यक्तींनी संसर्ग टाळण्यासाठी हात वारंवार स्वच्छ धुवा.
  • उघडय़ावरचे खाद्यपदार्थ, पेये टाळा.
  • आजाराचा संसर्ग झाल्यास पहिले तीन ते चार दिवस संपूर्ण विश्रांती घ्या.