25 February 2021

News Flash

स्वाईन फ्लूच्या दृष्टीने ऑगस्ट महिना ठरला त्रासाचा!

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे दोन हंगाम दिसून येतात

| September 7, 2015 03:30 am

लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)

ऑगस्टमध्ये राज्यात आढळलेल्या स्वाईन फ्लू रुग्णांची तसेच झालेल्या मृत्यूंची संख्या पाहता हा महिना राज्यासाठी त्रासाचाच ठरल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. ऑगस्टमध्ये राज्यात ७२ रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला असून यातील ६० टक्के मृत्यू मुंबई, ठाणे आणि नाशिक विभागात झाले आहेत.
२०१० मधला ऑगस्ट महिना स्वाईन फ्लूच्या दृष्टीने सर्वात त्रासदायक महिन्यांपैकी ठरला होता. या एकाच महिन्यात स्वाईन फ्लूमुळे राज्यात तब्बल २२२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत ऑगस्ट २०१५ मधील मृत्यूंची संख्या कमी दिसत असली तरी एका महिन्यात ७२ मृत्यू हा आकडा मोठा असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑगस्ट २०१५ मध्ये राज्यात स्वाईन फ्लूमुळे झालेल्या ७२ मृत्यूंपैकी ४३ मृत्यू मुंबई, ठाणे आणि नाशिक विभागातील आहेत. तर पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून ऑगस्टमध्ये ११ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला.
गेल्या ७ वर्षांमधील परिस्थिती पाहता चालू वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान झालेला स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव आतापर्यंतचा सर्वात मोठा हिवाळी उद्रेक ठरला. याबाबत विचारले असता राज्याच्या साथरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे दोन हंगाम दिसून येतात. यातील एक हंगाम हिवाळ्यात तर दुसरा पावसाळ्यानंतर (पोस्ट मान्सून) दिसतो. २०१० नंतर चालू वर्षीचा म्हणजे २०१५ च्या हिवाळ्यात झालेला उद्रेक सर्वात मोठा होता. या पूर्वी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात राज्यात इतक्या मोठय़ा प्रमाणावर स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडले नव्हते. हा उद्रेक केवळ महाराष्ट्रापुरता नसून तो देशभर दिसला. तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या ठिकाणीही या काळात स्वाईन फ्लूचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला.’
गेल्या ७ वर्षांतील स्वाईन फ्लूची परिस्थिती अशी –  
वर्ष        स्वाईन फ्लूची राज्यातील रुग्णसंख्या           मृत्यू
२००९        ५२७८                                                      २६८
२०१०        ६११८                                                         ६६९
२०११        ४२                                                                ६
२०१२        १५६४                                                       १३५
२०१३        ६४९                                                          १४९
२०१४        ११५                                                           ४३
२०१५ (आतापर्यंत)    ७१४३                                      ६४९*

(* २०१५ मधील ६४९ मृत्यूंमधील ३४ रुग्ण राज्याबाहेरचे होते.)
स्वाईन फ्लूची रुग्णसंख्येत मोठी तफावत का?
२००९-१० मध्ये आपल्याकडे स्वाईन फ्लू पहिल्यांदा आला आणि प्रचंड पसरला. या रोगाच्या रुग्णांची नोंद करण्यासही (सव्‍‌र्हेलन्स) तेव्हाच सुरुवात झाली. २००९-१० मध्ये मोठय़ा प्रमाणावर पसरलेल्या या विषाणूच्या विरोधात सामाजिक रोगप्रतिकारशक्तीही (हर्ड इम्युनिटी) तयार झाली. त्यानंतर स्वाईन फ्लूची आतापर्यंतची रुग्णसंख्या पाहता त्यात दर १ ते २ वर्षांगणिक मोठी तफावत दिसून येते. त्याचे एक कारण इन्फ्लुएन्झाच्याच विविध विषाणूंमधील (स्ट्रेन्समधील) अंतर्गत स्पर्धा असे सांगितले जाते. ज्या वर्षी स्वाईन फ्लू फारसा दिसला नाही त्या वर्षी एन्फुएन्झाच्याच विषाणूचा इतर कुठला तरी प्रकार वरचढ ठरलेला असू शकेल, परंतु एच १ एन १ खेरीज इतर स्ट्रेनच्या फ्लूची स्वाईन फ्लू सारखी नोंद केली जात नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 3:30 am

Web Title: swine flu patient death
टॅग : Death,Patient,Swine Flu
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याशिवाय अजितदादांना कामच नाही – दानवे
2 विश्व साहित्य संमेलनाचे दोन दिवस दोन पक्षांचे
3 चित्रपट रसास्वादाची सुरुवात ‘शोले’ किंवा ‘बजरंगी भाईजान’पासून हवी! – अतुल कुलकर्णी
Just Now!
X