स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजाराने पुणे शहराभोवतीचा विळखा घट्ट केला असून स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली असून स्वाईन फ्लूची लागण झाल्याने वीस नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरुन ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुमारे ३४२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी एकशे अठ्ठेचाळीस रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले. पाच रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांपैकी दोन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या एकशे नऊपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये बहात्तर रुग्ण जनरल वॉर्डमध्ये तर सदतीस रुग्ण व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या नवीन दहा रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

२०१८ मध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोनशे दोनवर गेली असून वर्षभरामध्ये एकोणसत्तर रुग्ण उपचारांअंती पूर्ण बरे झाले आहेत. शनिवारी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या दहा मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. वर्षभरामध्ये ६ लाख ५५ हजार सहाशे एकोणचाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांपैकी ८ हजार चारशे बावन्न रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. अंजली साबणे म्हणाल्या,की वातावरणात सातत्याने होणारे बदल हे स्वाइन फ्लूचा संसर्ग वेगाने पसरण्यासाठी हातभार लावतात. गेल्या दोन तीन दिवसात शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. कडक उन आणि पहाटे थंडी पडताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरात गेले काही दिवस मोठय़ा संख्यने नागरिक बाहेरुन आले आहेत. स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरु नये यासाठी संसर्गजन्य आजार झालेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu patients has crossed the hundreds
First published on: 23-09-2018 at 02:35 IST