स्वाईन फ्लूवरील उपचारांच्या बाबतीत पुण्यातील रुग्णांनी नायडू किंवा ससून या सार्वजनिक रुग्णालयांकडे पूर्णत: पाठ फिरवली आहे. सध्या शहरात तब्बल १५१ रुग्ण स्वाईन फ्लूवरील उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. यातील केवळ १५ रुग्ण नायडू व ससूनमध्ये दाखल आहेत. नायडू रुग्णालयात स्वाईन फ्लूसाठी ६० खाटा उपलब्ध असल्या तरी तिथे व्हेंटिलेटरची सुविधाच नाही, हे देखील यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने पुरवलेल्या आकडेवारीनुसार शहरात सध्या स्वाईन फ्लूचे एकूण ११७ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत. यातील ९३ रुग्ण वॉर्डात उपचार घेत असून, २४ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले आहे. याशिवाय आणखी ३४ संशयित स्वाईन फ्लू रुग्णही रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. नायडू संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय आणि ससून सवरेपचार रुग्णालयातील स्वाईन फ्लू वॉर्ड ही सामान्यांसाठीच्या स्वाईन फ्लू उपचारांसाठीची केंद्रे समजली जातात. असे असूनही या दोन ठिकाणी सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या केवळ १५ आहे. तब्बल १३६ रुग्णांनी खासगी रुग्णालयांतच उपचार घेणे पसंत केले आहे.
रविवारी संध्याकाळपर्यंत नायडू रुग्णालयात ५ रुग्ण दाखल होते आणि त्या सर्वाची प्रकृती स्थिर होती अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. फ्रान्सिस बेनेडिक्ट यांनी दिली. तर ससून रुग्णालयात सध्या केवळ एक स्वाईन फ्लूचा रुग्ण दाखल असून अन्य ९ स्वाईन फ्लू संशयितदेखील ससूनमध्ये दाखल आहेत, असे ससूनच्या औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. कदम यांनी सांगितले.
नायडू रुग्णालयात स्वाईन फ्लू रुग्णांसाठी एकूण ६० खाटा ठेवण्यात आल्या आहेत. या पैकी ५५ खाटा सध्या रिकाम्या आहेत. नायडू रुग्णालय स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे समजले जात असूनही या ठिकाणी अतिदक्षता विभागाची आणि त्यामुळे व्हेंटिलेटरची सुविधा नाही. याबाबत डॉ. बेनेडिक्ट म्हणाले, ‘‘रुग्ण आमच्याकडे दाखल झाल्यावर त्याच्या लक्षणांवरून त्याच्या डॉक्टरांकरवी तपासण्या केल्या जातात आणि त्यानुसार उपचार सुरू केले जातात. राज्य शासनाच्या निकषांनुसार रुग्णाला गरज असल्यास त्याला टॅमी फ्लूच्या गोळय़ा सुरू केल्या जातात. रुग्णाची प्रकृती गुंतागुंतीची असल्यास किंवा त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज असल्यास त्याला ससूनला पाठवले जाते. व्हेंटिलेटर (कृत्रिम श्वासोच्छ्वास) हे केवळ एक उपकरण असले तरी त्याच्या पाठीमागे अतिदक्षता विभागाची संपूर्ण यंत्रणा लागते. त्यासाठी लागणारी २४ तासांची प्रयोगशाळा, व्हेंटिलेटरचे तंत्रज्ञ, अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ या पायाभूत सुविधा नायडू रुग्णालयात नाहीत.’’ पालिकेच्या आरोग्य उपप्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘‘अधिक क्रयशक्ती असलेले अनेक लोक स्वाईन फ्लूच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयात जाणे पसंत करतात. नायडूमध्ये दाखल केलेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागाची गरज लागली तर त्यांना ससूनला पाठवले जाते.’’
ससून रुग्णालयात इन्फोसिस इमारतीत स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून सध्या १६ खाटा स्वाईन फ्लू रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. यातील ६ खाटा सध्या रिकाम्या आहेत. उपचारांच्या खर्चाबाबत डॉ. कदम म्हणाले, ‘‘ससूनमध्ये ‘कॉम्प्युटराईज्ड व्हॉल्यूम सायकल्ड’ प्रकारचे व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. स्वाईन फ्लूसाठी ससूनमध्ये जे उपचार सध्या उपलब्ध आहेत ते मोठय़ा वयाच्या गुंतागुंतीच्या रुग्णांना पुरेसे ठरतील असे आहेत.’’

‘‘ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयात जाणे परवडत नाही तेच प्रामुख्याने नायडू रुग्णालयात येतात. सध्या ससूनशी व्हेंटिलेटरची सोय पुरवण्यासाठी टाय-अप केले असून गुंतागुंतीचे रुग्ण ससूनला पाठवले जातात. नायडूमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा सुरू करण्याचा सध्या प्रस्ताव नसून आधी ही सुविधा कमला नेहरू रुग्णालयात सुरू करणार आहोत. परंतु कमला नेहरूमध्ये कामासाठी मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे ही सुविधा सुरू करता आली नाही. त्यासाठी जाहिरात देणार आहोत.’’
– आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी

लोकप्रतिनिधी म्हणतात…
आमदार मेधा कुलकर्णी यांनी नुकताच स्वाईन फ्लूमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा अनुभव घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘सर्वच नागरिकांना स्वाईन फ्लूसाठी खासगी रुग्णालयात दाखल होणे शक्य नसते. पालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागाची सोय इतक्या तातडीने करणे शक्य नसले तरी ज्या रुग्णांना स्वाईन फ्लूसाठी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात त्यांचे उपचार महापालिकेच्या वतीने केले गेले पाहिजेत. त्यासाठीचे धोरणात्मक निर्णय आरोग्यप्रमुखांनी घ्यायला हवेत. खासगी रुग्णालयांना वाढीव एफएसआयसारख्या सुविधा देताना त्याच्या बदल्यात या रुग्णालयांनी महापालिकेला काय द्यावे यासंबंधी करार केले जातात. मनात आणल्यास याअंतर्गत खासगी रुग्णालयातील स्वाईन फ्लू उपचार पालिकेतर्फे केले जाऊ शकतात.’’
 —
व्हेंटिलेटरचा खर्च वाढता वाढता वाढणारा!
व्हेंटिलेटरच्या खर्चाबाबत संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे म्हणाले, ‘‘व्हेंटिलेटरवर ठेवावे लागणाऱ्या रुग्णाला अंदाजे ५ ते १० हजार रुपये रोजचा खर्च येऊ शकतो. काही रुग्णांसाठी ‘ऑसिलेटर’ व्हेंटिलेटर वापरावा लागतो. हा व्हेंटिलेटर पुण्यात दोन-तीन रुग्णालयांमध्येच असून त्यासाठी दिवसाला ३० हजार रुपयेही खर्च येऊ शकतो. रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याच्यासाठी वापरण्याच्या व्हेंटिलेटरच्या प्रकारात बदल केला जातो.’’