व्यावसायिक आणि तंत्रज्ञानविषयक पदविका अभ्यासक्रम शिकताना अनेक विद्यार्थ्यांना येत असलेली इंग्रजी भाषेची अडचण दूर करण्यात येणार आहे. तांत्रिक शब्द तेवढे इंग्रजीमध्ये ठेवून संपूर्ण अभ्यासक्रम मराठीमध्ये शिकविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. यामागे कौशल्याधारित मनुष्यबळ घडविण्याच्या उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यशस्वी टेक्निकल इन्स्टिटय़ूटतर्फे राजेश टोपे यांच्या हस्ते ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत कौशल्ये विकसित केलेल्या विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. महापौर चंचला कोद्रे, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉपरेरेशनचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चिनॉय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे, आमदार विलास लांडे, तंत्र शिक्षण संचालक एस. के. महाजन आणि इन्स्टिटय़ूटचे विश्वेश कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
राजेश टोपे म्हणाले, व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण इंग्रजीतून दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आकलन होण्याच्या दृष्टीने भाषेच्या समस्या भेडसावतात. केवळ तांत्रिक शब्द तसेच ठेवून संपूर्ण अभ्यासक्रम मराठीमध्ये आणण्याचा सरकारचा विचार आहे. कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. अन्य अभ्यासक्रम मराठीमध्ये रूपांतरित करण्याचा सरकारचा मानस असून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संस्था अभ्यासक्रम तयार करीत आहे.
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉपरेरेशनच्या माध्यमातून राज्यात कोल्हापूर आणि जालना जिल्ह्य़ातील अंबड अशा दोन ठिकाणी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हे केंद्र सुरू होत असून ३० जुलै रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. तेथे किडनी विकारावरील उपचारांसाठी डायलिसिसची २० मशीन्स बसविण्यात येणार आहेत. हे उपचार करणारे तंत्रज्ञ घडवावेत हा प्रयत्न आहे. तर, कोल्हापूर येथे फाउंड्री उद्योगातील कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी अकादमी सुरू करण्यात येणार असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.