करोनासारख्या संकटकाळात काही खासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांवर उपचार करण्यात हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर असून, रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असा हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पार्श्‍वभूमीवर आज  पुण्यातील विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, करोनाचा प्रादुर्भाव टाळणे आणि अर्थचक्राला गती आणणे, हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी करोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे. याकामी नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसत असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, लॉकडाउनमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. उद्योगांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. रोजगार उपलब्धेतसाठी उद्योग-व्यवसाय सुरु करून जनजीवन सुरळीतता आणणे गरजेचे आहे.  त्याचबरोबर स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावे, यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.