गेल्या काही दिवसांत दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे सतत बदलणारे तापमान पुन्हा जाणवू लागले आहे. आठवडाभरापासून ‘ऑक्टोबर हीट’शी संबंधित आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली असून वातावरणीय बदलांपासून विशेषत: लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या दिसणारे उबदार हवामान विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरणारे आहे. त्यामुळे फ्लूसदृश आजार तर वाढले आहेतच पण त्याबरोबरीने ‘अक्यूट गॅस्ट्रोएंटेरायटिस’ म्हणजे उलटय़ा व जुलाबांचा त्रास विशेषत: बालकांमध्ये आढळून येत असल्याचे डॉ. राजेश आनंद यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘अतिसारासारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या गेल्या ७-८ दिवसांपासून वाढली आहे. दीड ते दोन वर्षांपर्यंतची बालके आणि नवजात अर्भकांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव अधिक दिसतो आहे. काही रुग्णांना अतिसाराबरोबर तापही येतो. यावर फारशा उपचारांची गरज नसली, तरी शरीरातील पाणी कमी होणे टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागते. नवजात अर्भकांना स्तनपान करणे, बालकांना ओआरएसचे पाणी देणे अशा उपायांचा फायदा होतो. चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत अतिसारावर काही परिणाम दिसला नाही, तर मात्र लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. अपचनाचा त्रास मोठय़ा माणसांमध्ये काही प्रमाणात दिसतो आहे.’’
पावसाळ्यानंतर अचानक बदलत्या तापमानाशी जुळवून घेण्यास शरीराला वेळ लागतो. या काळात रोगप्रतिकारशक्तीही कमी झालेली असते त्यामुळे विषाणूजन्य ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. उकाडय़ावर उपाय म्हणून पंखा लावणे, उन्हातून आल्यावर एकदम वातानुकूलित वातावरणात जाणे अशा बदलांमुळे सर्दी, घसा खवखवणे, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा येणे अशी लक्षणेही रुग्णांना दिसत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले.
काही दिवसांपूर्वीच पाऊस पडून गेल्यामुळे साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डासांमुळे पसरणाऱ्या आजारांनीही शहरात जोर धरला आहे. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार या वर्षी जानेवारीपासून ३४८ जणांना डेंग्यू झाल्याचे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या तपासणीत दिसून आले आहे. यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आढळलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १५७ आहे. मलेरियाचे जानेवारीपासून ११९ रुग्ण आढळले असून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आढळलेल्या रुग्णांची संख्या १६ आहे.   
डॉ. श्रीरंग उपासनी म्हणाले, ‘‘फ्लूसदृश लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना तापाबरोबरच थंडी वाजून येणे, अंग दुखणे अशी लक्षणेही दिसत असल्यामुळे त्यांना विशेषत: डेंग्यूसाठीची तपासणीही करायला सांगावी लागत आहे. थंडी सुरू झाल्यापासून डासांचे प्रमाण कमी होत असल्याने साधारणपणे नोव्हेंबरच्या मध्यापासून या आजारांचा प्रादुर्भाव कमी होऊ लागेल.’’