नाटक या कलाप्रकाराच्या क्षेत्रात साऱ्या देशात सर्वात जास्त काही घडत असेल, तर ते महाराष्ट्रात. आणि त्यातही पुण्या-मुंबईत. पुण्याने रंगभूमीच्या इतिहासातील अनेक पाने सोन्याची केली आहेत. संगीत नाटकाचा शुभारंभच एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुण्यात झाला. त्यानंतरच्या काळात याच पुण्याने रंगभूमीच्या क्षेत्रात प्रचंड योगदान दिले. मग ती ‘पीडीए’ ही भालबा केळकरांची संस्था असो की ‘थिएटर अॅकॅडमी’ किंवा ‘जागर’ यांसारखी संस्था असो. व्यावसायिक नाटकांच्या बरोबरीने या पुण्यात प्रयोगशील रंगभूमीची भरभराट झाली. इतकी की आज भारतात ही चळवळ केवळ पुण्यातच रसरशीतपणे जिवंत आहे.
पालथ्या घडय़ावर पाणी पडणार आहे, याची जाणीव असतानाही हे सारे पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या समस्त नगरसेवकांस आणि अधिकारी वर्गास सांगणे भाग आहे. कारण या सगळ्यांना नाटके करता येतात पण पाहायला मात्र सवड नसते. औंधसारख्या अतिविकसित भागात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘भारतरत्न भीमसेन जोशी नाटय़गृहा’बाबत जो वाद नव्याने उभा राहिला आहे, तो या सर्वाच्या दुर्लक्षामुळे आहे, हे वेगळे सांगायला नको. व्यावसायिक रंगभूमीला चांगले दिवस येत असताना पुण्यासारख्या संस्कृतीच्या माहेरघरी केवळ दोनच उत्तम नाटय़गृहे उभी राहावीत, हे निर्लज्जपणाचे आणि संस्कृतिहीन असल्याचे लक्षण आहे. टिळक स्मारक मंदिर आणि भरत नाटय़ मंदिर वगळता अन्य खासगी संस्थेलाही आणखी एक नाटय़गृह उभारण्याची गरज वाटली नाही. शहर चहूबाजूंनी वाढायला लागल्यानंतर शहराच्या उपनगरांमध्येही अशी नाटय़गृहे उभारण्याची कल्पना पुढे आली, तेव्हा स्थानिक नगरसेवकाऐवजी नाटक जगणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी पाचारण केले असते, तर असे वाद निर्माण झाले नसते.
बालगंधर्व रंगमंदिर उभे राहत असताना, पुणे महापालिकेने पु. ल. देशपांडे यांचे मार्गदर्शन घेतले होते. (त्या काळी पालिकेत खूपच गुणी नगरसेवक आणि अधिकारी होते, याचा हा एक पुरावा!) पुलंनी देशोदेशीच्या उत्तमोत्तम नाटय़गृहांची माहिती गोळा करून बालगंधर्व रंगमंदिर अधिक उत्तम कसे होईल, यासाठी प्रचंड कष्ट घेतले होते. भीमसेन जोशी नाटय़गृहातील रंगमंच नाटक करण्यासाठी अपुरा आहे, अशी तक्रार आहे. जागा कमी होती म्हणून असे करणे भाग पडले असा त्यावरील खुलासाही आहे. जागा नव्हती, तर असले अर्धवट नाटय़गृह काय नगरसेवकांच्या नातेवाइकांच्या मंगळागौरी आणि बारशांसाठी बांधले काय?
जे नाटय़गृह बांधून तेथे केवळ जळमटेच साठणार आहेत, त्यावर लाखो रुपये उधळण्याऐवजी खरेखुरे नाटय़रसिक आणि कलावंतांना आवडेल, असे नाटय़गृह बांधले असते, तर पुणेकर रसिकांचे तर दुवे मिळालेच असते, पण रंगभूमीची सेवा केल्याचे समाधानही मिळाले असते. पण असल्या समाधानात ‘अर्थ’ नसतो, याची पुरेपूर जाणीव पालिकेत बसलेल्या सर्वाना आहे.
औंधमधील नाटय़गृहाच्या या दारुण अनुभवाने बिबवेवाडी, येरवडा, सहकारनगर, सिंहगड रस्ता या भागात आता चांगली नाटय़गृहे होण्याची शक्यताही मावळली आहे. औंधचे नाटय़गृह बांधून पूर्ण झाले आहे, पण वापरता येत नाही आणि बालगंधर्वमधील स्वच्छतागृहे दुरुस्तीच्या नावाखाली महिनोन महिने बंद राहतात हे कर्मदरिद्रीपणाचे लक्षण आहे. ऐन मोक्याच्या ठिकाणी म्हणजे डेक्कन जिमखान्यावरील घोले रस्त्यावर पालिकेने एक छोटेसे नाटय़गृह बांधायला काढले आहे. पण गेली काही वर्षे निधीअभावी ते अपूर्णावस्थेत आहे. प्रायोगिक रंगभूमीची चळवळ वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या या नियोजित नाटय़गृहाचे काम सध्याच्या नगरसेवकांकडून वा अधिकाऱ्यांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही.
प्रायोगिक रंगभूमीवरील कलावंतांची नाटक करण्याची अपार हौस आणि त्यासाठी वाटेल ते सोसण्याची जिद्द पालिकेतल्या डोळ्यावर कातडी ओढलेल्या सगळ्यांना कशी जाणवेल. ही तरुण मुले कोणत्या संकंटांना तोंड देत रंगभूमी टिकवण्यासाठी जिवाचे रान करतात, हे तरी त्यांना कसे दिसेल. शनिवार पेठेतील दामले कुटुंबीयांनी आपल्या वाडय़ात सुदर्शन रंगमंच निर्माण करून या चळवळीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. जे पालिकेने करायला हवे, ते एका कुटुंबाने करून दाखवले आहे. पण त्याबद्दलची किमान लाजही कधी जाणवत नाही. पालिकेकडे रस्त्यांसाठी, दिव्यांसाठी, पाण्यासाठी पैसा असतो. पैसा असतो, तो केवळ अर्थसंकल्पात. कारण रस्त्यांसाठी तरतूद केलेले पैसे त्यावर खर्च होतच नाहीत. मग हे सारे पैसे कुठे मुरतात?
घोले रस्त्यावरील हे नाटय़गृह निधीअभावी रखडते आहे, याचे कारण नगरसेवकांना पुण्यातील रंगभूमीच्या चळवळीशी काही देणे-घेणे नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक प्रयोगासाठी काही जागा राखीव असतात. पण तेथे कुणीही बसत मात्र नाही. ज्या शहरात संस्कृतीची मशागत होत नाही, ते शहर मागासलेले राहते. पुण्याने मागासलेपणाचीही हद्द आता ओलांडली आहे. नगरसेवकांना त्यांच्या संस्थांसाठी पालिकेची नाटय़गृहे हवी असतात. त्यामुळे खऱ्या नाटकवाल्यांना ती मिळतातच असे नाही. रंगभूमीवर चाललेला हा भ्रष्टाचार केवळ आर्थिक नाही, तर नैतिकही आहे. गुळाची चव कळण्यासाठी आपल्या जिभांना रसबिंदू असावे लागतात, याचीच जाणीव नसलेल्यांकडून रंगभूमीने तरी काय अपेक्षा करावी?