डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येने धक्का बसला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था किती खालावली आहे, याचेच हे उदाहरण आहे. त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय वातावरणही निरोगी राहिलेले नाही, हे या घटनेवरून दिसून येते. या हत्यामागे असलेल्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आम्ही करत आहोत.
जादूटोणा विरोधी विधेयक संमत करणे शासनाची नैतिक जबाबदारी                                    – अन्वर राजन
हा हल्ला निषेधार्ह आहे. गांधीजींची हत्या करून त्यांचे विचार नष्ट झाले नाहीत. त्याचप्रमाणे दाभोलकरांचे विचारही या घटनेमुळे नष्ट होणार नाहीत. विचारावरची निष्ठा कधीही ढळू न देता, त्यांनी चळवळ पुढे नेली. डॉ. दाभोलकरांकडे असलेले संघटन कौशल्य, सामाजिक कृतज्ञता निधीसाठी त्यांनी केलेले योगदान खूप मोठे आहे. पुस्तकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसाठी त्यांनी स्रोत निर्माण केले. विचारावर निष्ठा ठेवून चळवळ पुढे नेण्याची त्यांची वृत्ती ही कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावी अशी होती. जादूटोणा विरोधी विधेयक संमत करणे ही आता शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी डॉ. दाभोलकरांसारख्या कार्यकर्त्यांने बलीदान दिल्यानंतर आता तरी शासनाने गंभीर भूमिका घ्यावी. डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेली चळवळ पुढे नेणे हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल.
महाराष्ट्र खरंच पुरोगामी म्हणावा का?
– रझिया पटेल
महाराष्ट्र पुरोगामी आहे असे आपण म्हणतो. हे खरे आहे का, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि विवेकवाद या मूल्यांसाठी दाभोलकर यांनी जीवनभर कार्य केले त्या मूल्यांचीच हत्या करण्यात आली. याविरोधात आवाज उठविला पाहिजे.
महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा
– उल्हास पवार
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा सर्व घटकातून फक्त निषेधच झाला पाहिजे. वैचारिक मतभेद असूनही उदार मतवादी, सर्वसमावेशक आणि संयमी अशी महाराष्ट्राची ओळख होती. मात्र, ही घटना त्याला काळीमा फासणारी आहे. पुरोगामी विचार देणाऱ्या समाजसुधारकांची, विचारवंतांची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. असे असताना डॉ. दाभोलकरांसारख्या विचाराशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या, सत्त्वशील कार्यकर्त्यांची विचारांना विरोध म्हणून हत्या होते, हे चिंताजनक आहे. डॉ. दाभोलकरांनी साधनासाठी दिलेले योगदानही मोठे आहे. साधनेला उदारमतवादी, मुक्त विचारांचे व्यासपीठ करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची हत्या करणाऱ्यांचा धिक्कार आहे. गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घेऊन, त्यांना कडक शिक्षा करावी अशी मी मागणी करतो.
सांस्कृतिक दारिद्रय़ दाखवणारा दिवस
– सुभाष वारे
समाजवादी, परिवर्तनवादी चवळवळीसाठी बदनामीकारक दिवस आहे. सांस्कृतिक दारिद्रय़ दाखविणार दिवस आहे. या सांस्कृतिक दारिद्रय़ाला आघाडी शासन जबाबदार आहे. डॉ. दाभोलकरांना कायमचा निरोप देण्याअगोदर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करा. त्यांचा बळी गेला आहे. त्यासाठी तरी कायदा करा. किती दिवस अहिंसेने लढावे. पण, ही आमची मर्यादा समजू नये. उठताबसता फुले आंबेडकरांचा गजर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विषमता आणि शोषण रोखण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा करता आला नाही, तर ते शाहू-फुले-आंबेडकरांनी दाखवलेल्या धर्मचिकित्सेच्या मार्गाने काय जाणार? मुख्यमंत्री उपमुख्यामंत्र्यांकडून आम्हाला उत्तर हवे आहे.
त्यांचे विचार अजरामरच राहतील
– डॉ. विजय भटकर
समाजाला दिशा देणाऱ्या विचारवंताची अशा प्रकारे हत्या होणे, हे धक्कादायक आहे. विचार नष्ट करण्यासाठी केलेला हा हल्ला म्हणजे भ्याडपणा आहे. डॉ. दाभोलकर यांच्या निधनानंतरही त्यांचे विचार आणि त्यांनी सुरू केलेली चळवळ अधिक प्रखरपणे सुरू राहील. त्यांचे विचार अजरामर राहतील. त्यांना मी आदरांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.
विवेक आटत चाचला आहे
– डॉ. यशवंत सुमंत
डॉ. दाभोलकरांसारख्या व्यक्तीची हत्या हे समाजातील विवेक आटत चालल्याचे उदाहरण आहे. प्रामाणिकपणे आणि निर्भिडपणे आपले म्हणणे मांडणाऱ्या कार्यकर्त्यांची हत्या ही सामाजिक जडणघडणीला धोका निर्माण करणारी आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या शक्ती काम करत आहेत, ते यावरून उघड होते. ही परिस्थिती पाहता महाराष्ट्राची चिंता वाटू लागली आहे. समाजातील प्रत्येकाने फक्त निषेधच करावा अशी ही घटना आहे.
विचार व्यक्त करायला लोक घाबरतील
– डॉ. सुहास पळशीकर
डॉ. दाभोलकरांच्या हत्येने झालेले नुकसान कधीही भरून न येणारे आहे. विशिष्ट विचारांचा प्रसार करताना तयार झालेल्या वैचारिक प्रतिस्पध्र्यामधून कुणामुळे हत्या झाली याबाबत काही स्पष्ट होत नाही, तोपर्यंत या मुद्दय़ावर काही बोलणे योग्य नाही. मात्र, तरीही त्यांच्या हत्येमुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपले विचार व्यक्त करायलाही लोकं घाबरतील.
समाज प्रबोधकांमध्ये निराशा
– शमसुद्दीन तांबोळी
मला डॉ. दाभोलकरांचेच एक वाक्य आठवते. ते म्हणाले होते, ‘हमीद दलवाई यांचे नैसर्गिक रीत्या निधन झाले याचे आश्चर्य वाटते, कारण ते जे काम करत होते, ते पाहता त्यांना हुतात्मा व्हावे लागले असते.’ आपण ज्या विचाराचा प्रसार करत आहोत, त्यामधून जमातवादी प्रवृत्तींचे शत्रू आपल्याला निर्माण होऊ शकतात. याची त्यांना पूर्ण कल्पना होती. कोणतीही किंमत देऊन चळवळ पुढे नेण्याची त्यांची तयारी होती. तर्कशुद्ध विचार, त्यांची तितकीच तर्कशुद्ध मांडणी यांमुळे चळवळीला प्रखर पण तरीही विवेकी आणि संयमी स्वरूप मिळाले होते. त्यांची अशा प्रकारे हत्या होणे हा लोकशाहीला धक्का आहे. त्यांच्या हत्येने समाज प्रबोधनासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरणार आहे.
राज्याला दिडशे वर्षे मागे नेणारी घटना
– अजित अभ्यंकर
डॉ. दाभोलकर हे पुरोगामी चळवळीला वाहिलेला माणूस होता. त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करतो. ही घटना राज्याला दीडशे वर्षे मागे नेणारी आहे. गेल्या दहा वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक प्रलंबित आहे. सत्ताधारी पक्ष याकडे जाणीवपूर्वक लक्ष करत आहेत. प्रमुख विरोधी पक्षाची विरोधीच भूमिका आहे. हिंसक राजकराण उदयाला येत आहे. त्याचीच ही निष्पत्ती आहे. धर्माध शक्तीने हा हल्ला केला आहे. परंतु या हल्ल्याला भिणार नाही. त्यांची पुरोगामी चळवळ पुढे सुरूच ठेवली जाईल. जातीवादी शक्तीच्या विरुद्ध धोके पत्कारूनच काम करावे लागेल.
अनेक दाभोलकर उभे राहातील
– सुनीती सु. र.
विवेकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. देवाला किंवा धर्माला त्यांचा विरोध नव्हता. पण, त्या नावाने शोषण होत होते त्याला त्यांचा विरोध होता. मुलतत्त्ववाद्यांनी त्यांची हत्या केली आहे. त्यांच्या हत्येमागील मुळापासून पाळेमुळे काढली पाहिजेत. डॉ. दाभोलकर हे पुरोगामी चळवळीचे आधास्तंभ होते. यानंतर अनेक दाभोळकर उभे राहतील. शांततेचा मार्ग न सोडता त्याचे कार्य पुढे नेऊ.
त्यांचे बलिदान वाया जाणार नाही
– डॉ. अनिल अवचट
 ही धक्कादायक घटना असून जवळचा मित्र अशा रितीने जावा याचे दु:ख आहे. विचारांनी संवाद साधण्याची मुभा असलेल्या या लोकशाही देशामध्ये आम्ही पिस्तुलाने प्रश्न सोडविणार आहोत का याची भीती वाटते. दाभोलकर यांचा आवाज बंद केला गेला. अशा पद्धतीने आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी गांधीजी जगभर पोहोचले. नरेंद्रचे बलिदान वाया जाणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचे रोप वाढणार आहे.
अराजकतेची नांदी
– अतुल पेठे
डॉ. दाभोलकर यांची हत्या ही अराजकतेची नांदी असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या दृष्टीने काळा दिवस आहे. समाजातील अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यांसारख्या अनिष्ट प्रथांविरोधातील अपप्रवृत्तींशी वैचारिकदृष्टय़ाा लढणारे वादळ अशा पद्धतीने शांत होईल असे वाटले नव्हते. ही घटना क्लेषदायक आहे.