२५ दहीहंडी उत्सव मंडळांवर कारवाई; प्रथमच कलम १८८ चा वापर=

सर्वोच्च न्यायालयाने वीस फुटांपेक्षा जास्त उंच दहीहंडी न बांधण्याचे आदेश देऊनही न्यायालयीन आदेश धुडकाविणाऱ्या मंडळांविरुद्ध पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शहराच्या मध्य भागातील मानाची दहीहंडी अशी ओळख असलेले बाबू गेनू मंडळ तसेच सुवर्णयुग तरुण मंडळासह पोलिसांनी शहर व उपनगरातील २५ मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेले आदेश धाब्यावर बसवून धडकी भरविणाऱ्या उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणेचा (साउंड सिस्टीम) वापर करणाऱ्या मंडळांविरुद्धही खटले दाखल करण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भादंवि १८८ अंतर्गत ११ मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून रस्त्यावर मांडव उभारून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या तसेच ध्वनिप्रदूषण करणाऱ्या १४ मंडळांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. ज्या मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा मंडळांविरुद्ध येत्या दोन ते तीन दिवसांत न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

पुणे शहरातील मध्यभाग तसेच उपनगरात मंडळांकडून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश भंग करण्याची गुरुवारी ‘स्पर्धा’च लागली होती. सुरुवातीला वीस फुटांवर बांधण्यात आलेली हंडी रात्री आपोआप उंचावर गेली. भरीस भर म्हणून गोविंदा पथकांना लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविण्यात आले होते. मध्य भागातील दहीहंडय़ा पुणे, बारामती, इंदापूर आणि मुंबईतील गोविंदा पथकांनी फोडल्या. डोळे दिपविणारे प्रकाशझोत (लेझर बीम) अवकाशात सोडण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही शहरातील अनेक भागांत विशेषत: विश्रांतवाडी, विमाननगर, वडगाव शेरी या उपनगरात सर्रास लेझर बीमचा वापर करण्यात आला होता. लेझर बीम सोडल्यामुळे विमानतळाच्या भागात अपघात होण्याची शक्यता आहे. अशा लेझर बीममुळे वैमांनिकांचे डोळे दिपतात. या पाश्र्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी विमानतळाच्या परिसरात लेझर बीम सोडण्यास मनाई आदेश दिले होते. धडकी भरविणाऱ्या साउंड सिस्टीमचाही वापर पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील अनेक मंडळांनी केला. त्यासाठी खास मुंबई, चेन्नई, हैदराबाद, गोवा येथून साउंडसिस्टीम मागविण्यात आल्या होत्या.

(पान १वरून) दिलेल्या आदेश भंग करण्याची गुरुवारी ‘स्पर्धा’च लागली होती. सुरुवातीला वीस फुटांवर बांधण्यात आलेली हंडी रात्री आपोआप उंचावर गेली. भरीस भर म्हणून गोविंदा पथकांना लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविण्यात आले होते. मध्य भागातील दहीहंडय़ा पुणे, बारामती, इंदापूर आणि मुंबईतील गोविंदा पथकांनी फोडल्या. डोळे दिपविणारे प्रकाशझोत (लेझर बीम) अवकाशात सोडण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही शहरातील अनेक भागांत विशेषत: विश्रांतवाडी, विमाननगर, वडगाव शेरी या उपनगरात सर्रास लेझर बीमचा वापर करण्यात आला होता. धडकी भरविणाऱ्या साउंड सिस्टीमचाही वापर पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील अनेक मंडळांनी केला. त्यासाठी खास मुंबई, चेन्नई, हैदराबाद, गोवा येथून साउंडसिस्टीम मागविण्यात आल्या होत्या.

पिंपरीत पोलिसांचे ‘सौजन्य’

न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या आणि नियम धुडकावून दहीहंडी साजरी करणाऱ्या अनेक मंडळांचा उत्सव पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी गुरुवारी रात्री अनुभवला, मात्र पिंपरी पोलिसांना तसे काहीच दिसून आले नाही. त्यामुळे एकाही दहीहंडी मंडळावर अथवा आयोजकावर गुन्हा दाखल झाला नाही.

उद्योगनगरीत रात्री उशिरापर्यंत दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा झाला. िपपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या आयोजकांची संख्या यंदा मोठय़ा प्रमाणात होती. त्यांनी दहीहंडीच्या लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा करून घेत स्वत:च ‘चमकोगिरी’ करून घेतली. बहुतांश आयोजकांनी नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र जागोजागी दिसून आले. शहरात झालेल्या दहीहंडीच्या जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये नगरसेवक, आमदार, खासदार असे राजकीय नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या सर्वाच्या साक्षीने मंडळाचे नियमबाह्य़ वर्तन सुरू होते. शुक्रवारी पोलिसांकडे विचारणा केल्यानंतर एकाही मंडळावर अथवा आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.

या मंडळांवर कारवाई

अखिल कवडे रस्ता दहीहंडी उत्सव, अखिल घोरपडी गाव दहीहंडी उत्सव समिती (मुंढवा), बालवीर मित्र मंडळ (भवानी पेठ), नातूबाग मित्र मंडळ, (बाजीराव रस्ता), राष्ट्रभूषण चौक क्रीडा संघ, (शिवाजी रस्ता), श्रीनाथ गणेश मंडळ (शुक्रवार पेठ), अकरा मारुती मंडळ (शुक्रवार पेठ), स्वराज्य मित्र मंडळ (गुरुवार पेठ, जैन मंदिर चौक), बंदीवान मारुती चौक ( गुरुवार पेठ), गोविंद हलवाई चौक (रविवार पेठ), अखिल कर्वेनगर दहीहंडी मंडळ (वारजे), चिदानंद प्रतिष्ठान (वारजे), अखिल वारजे कॅनोल रस्ता, (वारजे), पोकळे पाटील प्रतिष्ठान मंडळ (धायरी),  सुवर्णयुग तरुण मंडळ (बुधवार पेठ), हुतात्मा बाबूगेनू मंडळ (बुधवार पेठ), श्रीकृष्ण तरुण मंडळ (गणेश पेठ), गणेश पेठ पांगुळ आळी मंडळ, जुनाकाळ भैरवनाथ मंडळ (कसबा पेठ), प्रभात प्रतिष्ठान, तांबट हौद (कसबा पेठ), श्रीकृष्ण मित्र मंडळ, तांबट हौद, (कसबा पेठ), संयुक्त शुक्रवार पेठ दहीहंडी उत्सव समिती (नेहरू चौक), नेताजी प्रतिष्ठान, (आझादनगर, कोथरूड), राजमुद्रा ग्रुप (कर्वे रस्ता), हनुमान मित्र मंडळ ( कोथरूड)

भादंवि (कलम) १८८ काय म्हणते?

न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एक ते सहा महिने साधी कैद किंवा दंड अशी तरतूद कलम १८८ मध्ये आहे. दंडाची रक्कम ही न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असते.