द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या तुकडीला परवानगी मिळण्याआधीच त्यासाठी प्रवेश देऊन अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा ईशारा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने दिला आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होते. त्यातून द्विलक्षी अभ्यासक्रमांच्या तुकडय़ांच्या माध्यमातून पळवाट काढून जास्तीचे प्रवेश काही महाविद्यालयांनी दिल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. काही महाविद्यालये द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या तुकडीला परवानगी नसतानाही प्रवेश देतात. त्यामुळे अभ्यासक्रमासाठी मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश होतात. मान्यता नसताना करण्यात आलेले प्रवेश हे अनधिकृत ठरतात. त्या पाश्र्वभूमीवर असे प्रवेश करणाऱ्या महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी तंबी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने दिली आहे. विभागाचे संचालक दयानंद मेश्राम यांनी याबाबत पत्रक काढले आहे.

‘नियमबाह्य़ प्रवेश करून नंतर किमान दंड आकारून असे प्रवेश नियमित करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातो,’ असे देखील या पत्रकात म्हणण्यात आले आहे. प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही अकरावीला द्विलक्षी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना मान्यतेबाबत खातरजमा करून घ्यावी,’ असे आवाहनही विभागाकडून पालकांना करण्यात आले आहे.