कृ. ब. तळवलकर ट्रस्टतर्फे देण्यात येणारे पुरस्कार यंदा डॉ. नरेंद्र दाभोलकर, चंद्रशेखर पोतनीस, मानसी करंदीकर आणि केतकी घाटे यांना जाहीर झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी रोजी एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
कृ. ब. तळवलकर यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार दिले जाताता. या वर्षी ‘समाजशिक्षण’ पुरस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. त्यांच्या वतीने त्यांचे पुत्र डॉ. हमीद हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. ट्रस्टतर्फे ‘अनुकरणीय उद्योजक’ हा चंद्रशेखर पोतनीस यांना, ‘अवनीमित्र’ पुरस्कार मानसी करंदीकर आणि केतकी घाटे यांना जाहीर झाला आहे. दाभोलकरांना त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. पोतनीस यांनी व्यवसायिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे. निसर्गाचा ऱ्हास कसा थांबवता येईल या विचारातून स्थापन केलेली संस्था आणि पर्यावरणासाठी दिलेले योगदान यासाठी करंदीकर आणि घाटे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.