महाराष्ट्रातील लोकनाटय़ तमाशा फड मालकांच्या दृष्टीने गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. या दिवसाचे औचित्य साधून नारायणगाव येथील तमाशा पंढरीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील गावकारभाऱ्यांची जणू जत्राच भरली होती. आपल्या गावातील तमाशाची सुपारी देण्यासाठी सर्व राहुटय़ांमधून रेलचेल चालली होती. दिवसभरात सुमारे २०० तमाशा कार्यक्रमांच्या सुपाऱ्या जाऊन साधारणपणे सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल तमाशा पंढरीत झाली.
     प्रत्येक फड मालकांना दिवसभरात ७ ते १५ सुपाऱ्या मिळाल्या. या वर्षीच्या अवकाळी पावसाचा फटका देखील फड मालकांना बसल्याचे दिसून येत होते. प्रमुख तारखा असलेल्या कालाष्टमीची सर्वाधिक सुपारी भिका भिमा यांची ३ लाख २५ हजार, रघुवीर खेडकर यांची ३ लाख, तर त्या खालोखाल मंगला बनसोडे, अंजली राजे नाशिककर, तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे, मालती इनामदार, लता पुणेकर, रवींद्र खोमणे औरंगाबादकर आदींच्या सुपाऱ्या या प्रमुख दिवशी गेलेल्या आहेत. सध्या तमाशा पंढरीत अंजली नाशिककर, मंगला बनसोडे, विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर, शाहीर संभाजी जाधव संक्रापूरकर, काळू-बाळू, भिका-भिमा सांगवीकर, किरण ढवळपुरीकर, मालती इनामदार, विनायक महाडीक, बाळासाहेब मेंढापूरकर, ईश्वर बापू िपपळेकर, हरिभाऊ बढे नगरकर, रवींद्र खोमणे औरंगाबादकर, काळूराम मास्तर वेळवंडकर, संध्या माने सोलापूरकर, बाळ आल्हाट आदी तमाशा फडाच्या राहुटय़ा उभारण्यात आलेल्या आहेत.
   महाराष्ट्राची लोककला असलेल्या लोकनाटय़ तमाशाची सुपारी देण्यासाठी पुणे, नगर, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक अशा  जिल्ह्य़ातील ग्रामस्थ, गावकरी, पंच कमिटी, यात्रा उत्सव कमिटी, पुढारी यांची नारायणगावच्या तमाशा पंढरीत गर्दी झाली होती. तमाशात कलाकार किती, महिला कलावंत किती, वग कोणता, गावी किती होणार याची प्रामुख्याने विचारणा गाव पुढऱ्यांकडून होत होती.