शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यात आता ‘तामिळनाडू पॅटर्न’ राबवण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक ठेवण्याऐवजी दोन किंवा तीन विषयांचे मिळून एका सत्रासाठी एक पुस्तक अशी रचना करण्यात यावी अशी शिफारस याबाबत नेमण्यात आलेल्या सामितीने केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हा विषय गेले अनेक महिने चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण विभागाने समिती नेमली होती. या समितीने अंतरिम अहवाल सादर केला आहे. त्यानुसार राज्यात तामिळनाडूप्रमाणे सुधारणा करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
सध्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे पुस्तक, वही आणि इतर सामान असा जामानिमा शाळेत न्यावा लागतो. त्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढते. या अहवालानुसार प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाची दोन सत्रांमध्ये विभागणी करण्यात यावी आणि विषयानुसार स्वतंत्र पुस्तक ठेवण्याऐवजी दोन किंवा तीन विषयांचे मिळून सत्रानुसार पुस्तक ठेवण्यात यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांला एक किंवा दोनच पुस्तके शाळेत न्यावी लागतील. त्याचप्रमाणे शाळांनी त्यांचे वेळापत्रक तयार करताना एका दिवशी सात किंवा आठ विषयांचे तास ठेवण्याऐवजी तीन किंवा चार विषयांचे तासच ठेवावेत. पुस्तकांचे वजन कमी करण्यासाठी कमी जाडीचा आणि हलका कागद वापरण्यात यावा. प्रत्येक शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी, जेणेकरून दप्तरातील पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी होऊ शकेल, अशा शिफारशी समितीने केल्या आहेत.
त्याचप्रमाणे अनेक शाळा नियोजित पुस्तकांव्यतिरिक्त व्यवसाय, सराव पुस्तके विद्यार्थ्यांना घेणे बंधनकारक करतात. ही पुस्तके शाळेत आणण्याचे विद्यार्थ्यांना बंधन करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे कार्यानुभवसारख्या विषयांचे साहित्य हे शक्यतो शाळांमध्येच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, अशा शिफारशीही या समितीने केल्या आहेत. याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.