News Flash

पुण्यातून ‘टॅन्जन्ट’ महाअंतिम फेरीत

लोकसत्ता लोकांकिकाची पुणे विभागीय अंतिम फेरी शुक्रवारी भरत नाटय़ मंदिर येथे अपार उत्साहात झाली.

सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे प्रथम पारितोषिक मिळवणारा ‘टॅन्जन्ट’ एकांकिकेतील काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ.

पुणे : पैशामुळे कुटुंबातील नातेसंबंध कसे गुंतागुंतीचे होतात या विषयावर भाष्य करणाऱ्या टॅन्जन्ट या काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकांकिकेने ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागीय अंतिम फेरीत बाजी मारली. या एकांकिकेची मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

लोकसत्ता लोकांकिकाची पुणे विभागीय अंतिम फेरी शुक्रवारी भरत नाटय़ मंदिर येथे अपार उत्साहात झाली. विद्यार्थ्यांसह नाटय़प्रेमी पुणेकरांनी विभागीय अंतिम फेरीत सादर झालेल्या एकांकिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंतिम फेरीत काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टॅन्जन्ट या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकासह सर्वाधिक लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत ही सहा वैयक्तिक पारितोषिकेही पटकावली.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. दोन्ही परीक्षकांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. लोकसत्ताचे सहायक संपादक मुकुंद संगोराम, एक्स्प्रेस समूहाच्या जाहिरात विभागाचे जनरल मॅनेजर सारंग पाटील या वेळी उपस्थित होते.

‘लोकसत्ता लोकांकिका’ हा महाविद्यालयीन रंगकर्मीसाठी महत्त्वाचा मंच आहे. सातत्याने ही स्पर्धा आयोजित करणे कौतुकास्पद आहे. पुणे विभागीय अंतिम फेरीत सादर झालेल्या एकांकिकांमध्ये विषय वैविध्य होते. विद्यार्थ्यांनी ऊर्जेने सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी तंत्राच्या आहारी न जाता आशयावर, नेटक्या मांडणीवर भर द्यायला हवा. तसेच नाटय़ म्हणजे काय याचाही बारकाईने विचार करावा.

– पौर्णिमा मनोहर, परीक्षक

‘लोकसत्ता लोकांकिका’ ही उत्तम स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या रुपाने विद्यार्थ्यांना मोठी संधी प्राप्त होत आहे. पुणे विभागीय अंतिम फेरीत विद्यार्थ्यांनी चांगला प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी भपकेबाज, तंत्राधिष्ठित काही करण्यापेक्षा आशयानुरूप मांडणी करणे आवश्यक आहे. इंटरनेट, माध्यमांच्या पलीकडे जाऊन विषय समजून घेण्याची गरज आहे.

– दिग्पाल लांजेकर, परीक्षक

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या विभागीय अंतिम फेरीत पहिले पारितोषिक मिळाले, महाअंतिम फेरीत जाण्याची संधी मिळाली याचा आनंद खूप मोठा आहे. या स्पर्धेत आम्ही पहिल्यांदाच सहभाग घेतला होता आणि पहिल्याच प्रयत्नात महाअंतिम फेरी गाठण्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. परीक्षकांनी केलेल्या सूचनांवर विचार करून महाअंतिम फेरीत अजून दमदार सादरीकरण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी पुढील काही दिवस आम्ही जास्त मेहनत घेणार आहोत. महाअंतिम फेरीच्या निमित्ताने आणखी प्रेक्षकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल.

– हेमंत पाटील, (टॅन्जन्ट, काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय)

गेल्या वर्षी आम्हाला महाअंतिम फेरीत तृतीय पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे यंदा काही नव्या सदस्यांसह आम्ही महाअंतिम फेरीचेच लक्ष्य ठेवून प्रयत्न करत होतो. ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही महत्त्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेतून व्यापक स्तरावर जाण्याची संधी मिळते, स्वतला पारखून घेता येते. विभागीय अंतिम फेरीत आम्ही पूर्ण प्रयत्न केला. पण द्वितीय क्रमांक मिळाल्याचाही निश्चितच आनंद आहे. या वर्षी गाठीशी आलेला अनुभव आम्हाला पुढील वर्षी कामी येईल.

– मुक्ता बाम (टिळा, फग्र्युसन महाविद्यालय)

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीचा प्रयोग हा आमच्या एकांकिकेचा पहिला प्रयोग होता. अगदी नवीकोरी संहिता आम्ही सादर केली होती. या स्पर्धेतून संगीत एकांकिका करण्याचा वेगळा प्रयोग आम्ही केला. फारशी माहीत नसलेली गोष्ट मांडण्याचा उद्देश त्या मागे होता. त्यामुळे आमच्या या प्रयोगाचे तृतीय पारितोषिकाच्या रुपाने कौतुक झाले याचा आनंद वाटतो.

– हिमांशू बोरकर (कुणीतरी पहिलं हवं, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय)

प्रायोजक : लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदारदेखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 2:05 am

Web Title: tangent drama from pune enter in mega final round from mumbai division in loksatta lokankika zws 70
Next Stories
1 कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा संपणार!
2 मद्यपी मोटारचालकामुळे संगणक अभियंता युवती मृत्युमुखी
3 लोकांकिकेतील सादरीकरणांना नाटय़प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Just Now!
X