देवदर्शनावरून निघालेले पाचजण जीप आणि टँकरची समोरासमोर झालेल्या अपघातात जागीच ठार झाले. बारामतीतील पिंपळी-लिमटेक येथे रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. अपघातात ठार झालेले पाचजण पुरंदर तालुक्यातील हिवरे गावचे रहिवासी आहेत.
किरण बाळासाहेब कुदळे (वय ४०), रखमाबाई एकनाथ गायकवाड (वय ५५), स्वाती अशोक बोरावके (वय ४३), लक्ष्मीबाई शंकर गायकवाड (वय ८०), सुरेखा नामदेव कुदळे (वय ४५, सर्व रा. हिवरे, ता. पुरंदर ) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात भाग्यश्री रमेश कुदळे (वय १८), मोनिका किरण कुदळे (वय ३५), पूजा परशुराम कुदळे (वय १८) आणि मंजूषा पांडुरंग कुदळे (वय २०) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तेजश्री संतोष गायकवाड (वय तीन) आणि चैतन्य किरण कुदळे (वय दोन) हे बचावले आहेत.
कुदळे, गायकवाड आणि बोरावके हे नातेवाईक आहेत. ते सर्वजण तुळजापूर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून ते दोन वाहनांमधून निघाले. बारामतीजवळ असलेल्या पिंपळी-लिमटेक येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समोरून येणाऱ्या टँकरची आणि जीपची धडक झाली. या अपघातात जीपचालक किरण, रखमाबाई, स्वाती, लक्ष्मीबाई, सुरेखा हे जागीच ठार झाले. अपघात झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तेथे धाव घातली आणि अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब बांगर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी तेथे भेट दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला आणि  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुरंदर तालुक्यातील हिवरे गावात शोककळा पसरली.