News Flash

नसीरुद्दीन शाह यांना तन्वीर सन्मान

महाराष्ट्र कल्चरल सेंटरला नाटय़धर्मी पुरस्कार

महाराष्ट्र कल्चरल सेंटरला नाटय़धर्मी पुरस्कार

पुणे : रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी-दिग्दर्शक नसीरुद्दीन शाह यांना यंदाचा ‘तन्वीर सन्मान’ जाहीर झाला आहे. तर, प्रायोगिक रंगभूमीसाठी गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरला ‘नाटय़धर्मी पुरस्कार ’ जाहीर झाला आहे.

यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे ९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक-शाह या नसीरुद्दीन यांच्याविषयी बोलणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानच्या कार्यवाह दीपा श्रीराम आणि विश्वस्त गौरी लागू यांनी शुक्रवारी दिली.

एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे तन्वीर पुरस्काराचे, तर ३० हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे ‘नाटय़धर्मी’ पुरस्काराचे स्वरूप आहे.

रंगभूमीवर आणि चित्रपटांत सातत्याने गेली काही दशके कार्यरत असलेले नसीरुद्दीन शाह कालसुसंगत, नव्या जाणिवांची इंग्रजी, हिंदूी आणि ऊर्दू भाषेतील नाटके सादर करतात. बेंजामिन गिलानी, टॉम अल्टर, आकाश खुराना, रत्ना पाठक-शाह यांच्यासह मॉटले या संस्थेद्वारे ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘आईनस्टाईन’, ‘द लेसन’, ‘झू स्टोरी’, ‘ज्युलिअर सिझर’, ‘इस्मत आपा के नाम’ आणि ‘फादर’ यांसह त्यांनी आतापर्यंत ४२ नाटके सादर केली आहेत.

प्रायोगिक रंगभूमीसाठी पंचवीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर संस्थेची सु-दर्शन रंगमंच आणि ज्योत्स्ना भोळे सभागृह अशी दोन सभागृहे कलाकारांना उपलब्ध असतात. नाटकासमवेत संगीत, नृत्य, चित्रकला याविषयीचे अनेक उपक्रम केले जातात. ग्रीप्सची नाटके तसेच इतर नाटकांचीही संस्थेतर्फे निर्मिती केली जाते.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम यांचा मुलगा तन्वीर याचे एका अपघातामध्ये निधन झाले. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन झालेल्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे गेल्या १४ वर्षांपासून ‘तन्वीर सन्मान’ प्रदान केला जातो.

पुणेकरांना १५ वर्षांनी नसीरजी यांचे दर्शन

रूपवेध प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे (एनएसडी) इब्राहिम अल्काझी यांना पहिला तन्वीर सन्मान प्रदान करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात नसीरूद्दीन शाह यांनी अल्काझी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारे मनोगत व्यक्त केले होते. आता १५ वर्षांनी पुन्हा एकदा नसीरुद्दीन शाह यांचे पुणेकरांना दर्शन घडणार आहे, असे गौरी लागू यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 3:12 am

Web Title: tanveer samman to naseeruddin shah zws 70
Next Stories
1 वाहन परवान्याची चाचणी कठीण
2 लखनवी जातीच्या पेरूचा हंगाम सुरू!
3 जिल्ह्य़ात शिवतारे, लांडगेंचा  निवडणूक खर्च सर्वाधिक
Just Now!
X