राज्यशासनाने लागू केलेल्या एलबीटीच्या (स्थानिक संस्था कर) विरोधासाठी व्यापाऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरलेले शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अक्षरश: धुमाकूळ घातला व आगामी निवडणुकांसाठी स्वत:च्या मावळ लोकसभा मतदारसंघाची व्यवस्थित बांधणी करून घेतली आहे. एलबीटी आंदोलनाच्या माध्यमातून ते सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहिल्याने बाबर यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ‘मावळ’ची पहिली फेरी पूर्ण केल्याचे दिसते.
पिंपरी नगरपालिकेत नगरसेवक, महापालिकेतील विरोधी पक्षनेता, ‘हवेली’ चे दोन वेळा आमदार, गजानन बँकेचे संस्थापक अध्यक्ष, साताऱ्यातील कारखान्याचे उपाध्यक्ष व ‘मावळ’ चे खासदार अशा चढत्या क्रमाने राजकीय शिडी चढणाऱ्या बाबरांची खासदारकीची टर्म पूर्ण होत आली आहे. वयाची सत्तरी गाठली असली, तरीही बाबरांना दुसऱ्यांदा खासदार व्हायचे आहे. वाढत्या वयामुळे पक्ष पुन्हा विचार करेल का, याविषयी साशंकता आहे. मात्र, उमेदवारी आपल्यालाच, अशी खात्री बाळगून बाबर कामाला लागले आहेत. एलबीटीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे हेरून त्यांनी हा मुद्दा पूर्णपणे ‘कॅश’ केला. एलबीटीची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत काहीच न केलेल्या बाबरांनी नंतर आंदोलनातून रान पेटवले. राज्यशासनाशी संबंधित प्रश्न असताना बाबरांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातील महापालिका केंद्रिबदू ठेवून आंदोलनाची रचना केली. मतदारसंघातच आंदोलनाचे कार्यक्रम पार पाडताना पहिल्या टप्प्यात मोर्चे, धरणे, सभा तर दुसऱ्या टप्प्यात महाआरतींचा सपाटा लावला. प्रत्येक ठिकाणी हजारोंच्या संख्येत व्यापारी एकत्र येत होते. मॉलमध्ये गांधीगिरी, चिंचवड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन, पिंपरीतील सभेत लाठीमार, नंतरचे जेलभरो आंदोलनाचे नेतृत्व करणारे बाबर प्रसिद्धीच्या झोतात राहिले. राज्यशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर बंद मागे घेतला, मात्र, आंदोलनाच्या यशाचे बरेचसे श्रेय बाबरांच्या खात्यात जमा झाले.
वास्तविक व्यापाऱ्यांना थेट झळ बसणारा हा विषय नसता तर बाबरांच्या सभा अन् आंदोलनांकडे कोणी फिरकले नसते, याची कबुली बाबर यांनीच आकुर्डीच्या खंडोबा मंदिरात दिली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतानाच अक्षय तृतीयेला दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडणारे सरकार पाडल्याशिवाय आणि २०१४ ला सरकारला धक्का दिल्याशिवाय व्यापारी राहणार नाही, अशी विधाने भाषणात सातत्याने करत त्यांनी आपले राजकीय मनसुबे स्पष्ट केले होते. बाबर समर्थक वगळता शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व नगरसेवक आंदोलनात नव्हते. मावळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी बाबरांचे प्रतिस्पर्धी असलेले सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे त्यांच्या आंदोलनापासून चार हात लांबच राहिले. बाबरांना राष्ट्रवादीशी दोन हात करायचे असल्याने बाबर यांनी शक्य तिथे राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची खेळी यानिमित्ताने केली.