उद्योग क्षेत्रातील चिंतेत भर

उद्योगनगरीचा कणा मानल्या जाणाऱ्या टाटा मोटर्सच्या चिखली प्रकल्पात ‘ब्लॉक क्लोजर’ चे पर्व सुरू आहे. ३० मे पासून २९ जूनपर्यंत महिनाभरातच १० दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ घेतल्यानंतर कंपनीने आता ५ ते १० ऑगस्ट असे सहा दिवस पुन्हा ‘ब्लॉक क्लोजर’ घेतल्याने उद्योग क्षेत्रातील चिंतेत भरच पडली आहे.

वाहन उद्योगातील सततच्या मंदीमुळे वाहनांच्या विक्रीत घट होत आहे. उद्योगनगरीतील शेकडो उद्योग टाटा मोटर्सवर अवलंबून आहेत. तेथील परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या काही दिवसांच्या अंतरावर कंपनीने सातत्याने ब्लॉक क्लोजर घेतले आहेत.

कार विभागात (कार प्लान्ट) ३० मे २९ जून दरम्यान दहा दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ होता. पिंपरी प्रकल्पात (जे ब्लॉक) एक ते तीन ऑगस्ट दरम्यान चार दिवसांचा ‘ब्लॉक क्लोजर’ घेण्यात आला. त्या पाठोपाठ, आता वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीचे कारण देत कंपनीने ५ ते १० ऑगस्ट असे सहा दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ जाहीर केला आहे.

कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेतील करारानुसार, एक जानेवारी ते ३१ डिसेंबर या आर्थिक वर्षांत आवश्यकतेनुसार १८ ब्लॉक क्लोजर घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. वर्षांतून १८ ब्लॉक क्लोजर करण्याचे धोरण असले तरी, यंदा सात महिन्यात तो आकडा पूर्ण झाला आहे. आणखी काही ब्लॉक क्लोजर याच वर्षांत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पिंपरी प्रकल्पातील ट्रक विभागातही ८ ते १० ऑगस्ट असा स्वतंत्र ब्लॉक क्लोजर घोषित करण्यात आला.

वाहन उद्योगातील जवळपास सर्वच कंपन्यांची वाहनविक्री कमी झालेली आहे. साधारणपणे १०-१२ वर्षांनंतर अशी परिस्थिती निर्माण होते. टाटा मोटर्समध्ये फारशी वेगळी स्थिती नाही. कंपनीतील घडामोडींचा थेट परिणाम कोणत्याही एकावर नव्हे तर सर्वच स्वरूपाच्या उद्योगांवर होताना दिसतो. मंदीचे वातावरण हलक्या स्वरूपांच्या वाहनांच्या उत्पादनाच्या बाबतीत असले तरी जड वाहनांच्या बाबतीत तसे नाही.       – सचिन लांडगे, अध्यक्ष, टाटा मोटर्स कामगार संघटना