उद्योगनगरी पिंपरीत चिंतेचे वातावरण

उद्योगनगरीचा कणा मानल्या जाणाऱ्या टाटा मोटर्सच्या चिखली प्रकल्पात ‘ब्लॉक क्लोजर’ चे पर्व अजूनही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी  ३० मेपासून २९ जूनपर्यंत आणि ५ ते १० ऑगस्ट असा ‘ब्लॉक क्लोजर’ घेण्यात आला असताना, येत्या २८ ते ३१ ऑगस्ट आणि ३ ते ६ सप्टेंबर अशा दोन टप्प्यात मिळून कार विभागात आठ दिवस ब्लॉक क्लोजर घेण्यात येणार आहे. कंपनीतील या घडामोडींमुळे उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

वाहन उद्योगातील सततच्या मंदीमुळे वाहनांच्या विक्रीत घट होत आहे. त्याचा मोठा फटका टाटा मोटर्सला बसतो आहे. उद्योगनगरीतील शेकडो उद्योग टाटा मोटर्सवर अवलंबून आहेत. गेल्या काही दिवसांपासून कंपनीतील परिस्थिती चिंतानजक आहे.  काहीच दिवसांच्या अंतरावर कंपनीने सातत्याने ब्लॉक क्लोजर घेतले आहेत.

कार विभागात ३० मे ते २९ जून दरम्यान दहा दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ होता. िपपरी प्रकल्पात (जे ब्लॉक) एक ते तीन ऑगस्ट दरम्यान चार दिवसांचा ‘ब्लॉक क्लोजर’ घेण्यात आला. कंपनीने ५ ते १० ऑगस्ट असे सहा दिवस ‘ब्लॉक क्लोजर’  घेतला. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर कंपनीने २८, २९, ३०, ३१ ऑगस्ट असे चार दिवस आणि ३, ४, ५, ६ सप्टेंबर असे चार दिवस मिळून आठ दिवसांचा ब्लॉक क्लोजर जाहीर केला आहे.