News Flash

टाटा मोटर्सच्या कार विभागात महिनाभरात १० दिवस ‘काम बंद’

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्राचा कणा म्हणून टाटा मोटर्सकडे पाहिले जाते.

पिंपरी : टाटा मोटर्सच्या पुणे (चिखली) प्रकल्पातील कार विभागात एका महिनाभरात १० दिवस काम बंद (ब्लॉक क्लोजर) ठेवण्यात येत आहे. कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातील कराराप्रमाणे आवश्यकतेनुसार १२ ते १८ दिवस काम बंद ठेवले जाते. त्यानुसार टप्प्याटप्प्याने १० दिवसांसाठी ‘ब्लॉक क्लोजर’ होत असून शुक्रवार आणि शनिवारी (२८, २९ जून) काम बंद ठेवले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्राचा कणा म्हणून टाटा मोटर्सकडे पाहिले जाते. टाटा मोटर्समुळे पिंपरी-चिंचवडची ऑटो मोबाईल हब अशी ओळख निर्माण झालेली आहे. शहरातील अनेक मध्यम, लघुउद्योग टाटा मोटर्सवर अवलंबून आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहन उद्योगावर औद्योगिक मंदीचे मळभ आहे. त्याचा परिणाम टाटा मोटर्सवरही झाल्याचे मानले जाते.

टाटा मोटर्सच्या कार विभागात ३०, ३१ मे आणि १ जून व त्यानंतर, ६, ७ आणि ८ जून, १४ आणि १५ जून असे आठ दिवस काम बंद होते. याशिवाय, शुक्रवारी (२८ जून) आणि शनिवारी (२९ जून) असे दोन दिवस काम बंद राहणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. जेमतेम महिनाभराच्या अंतरात १० दिवस काम बंद ठेवण्यात येत आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर या आर्थिक वर्षांत आवश्यकतेनुसार ‘ब्लॉक क्लोजर’ घेण्याचे कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेने मान्य केले आहे. दोन दिवसांचा ‘ब्लॉक क्लोजर’ असल्यास एक दिवस रजा धरली जाते. तर, एक दिवस पगारी सुटी दिली जाते. ‘ब्लॉक क्लोजर’च्या कालावधीत दुरुत्यांची कामे करण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येते. औद्योगिक मंदीचे कारण देत कंपनीने कार विभागात यापूर्वी अनेकदा ‘ब्लॉक क्लोजर’ घेतला आहे.

कार विभागातील ‘ब्लॉक क्लोजर’चे १० दिवस

’ ३० मे, ३१ मे आणि १ जून (तीन दिवस)

’ ६, ७, ८ जून (तीन दिवस)

’ १४, १५ जून (दोन दिवस)

’ २८, २९ जून (दोन दिवस)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 3:07 am

Web Title: tata motors car division stop work for 10 days in a month zws 70
Next Stories
1 महामार्गावरील वाहतूक बेशिस्तीला अत्याधुनिक वाहनांद्वारे अंकूश 
2 समान पाणीपुरवठा योजनेची कामे संथ
3 पुण्यात सर्वाधिक रोजगारसंधी निर्माण होणार
Just Now!
X