टाटा मोटर्स कंपनीने २००६ मध्ये कामावरुन काढून टाकलेल्या प्रभाकर क्षीरसागर या अपंग कामगाराला पुन्हा सेवेत सामावून घेण्याबाबत कामगार न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात कंपनी औद्योगिक न्यायालयात दाद मागणार असून, त्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.
क्षीरसागर हे १९७५ पासून टाटा मोटर्समध्ये काम करत होते. ते काही काळासाठी कामगार संघटनेचे अध्यक्षही होते. ते सातत्याने आजारी राहत असल्याचे कारण देऊन त्यांना २००६ मध्ये कंपनीतून काढून टाकण्यात आले. त्याबाबत क्षीरसागर यांनी कामगार न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणाचा निकाल १६ मार्च २०१५ रोजी लागला. त्यात, कंपनीने त्यांना कामावर सामावून घ्यावे आणि त्यांना २० टक्के पगार द्यावा, असे आदेश कामगार न्यायालयाने दिले.
मात्र, या निकालाच्या विरोधात कंपनीने औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागितली होती. याबाबत कंपनीतर्फे निवेदन प्रसिद्धिस देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, क्षीरसागर हे १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २००४ या काळात कंपनीत आले नाहीत. त्यांचे कार्ड दुसरेच कोणीतरी स्वाईप करत होते. याबाबत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते, पण ते हजर राहिले नाहीत. त्यांनी आजारपणाचे कारण देऊन बराच काळ सुटी घेतली. त्यानंतर त्यांना ३१ जानेवारी २००६ रोजी कामावरून कमी करण्यात आले. त्या वेळी त्यांना देय असलेली सर्व रक्कम देण्यात आली आहे. या संदर्भात क्षीरसागर यांनी कामगार न्यायालयात दाद मागितली. तेथे त्यांच्या बाजूने निकाल लागला. मात्र, कंपनीने या निकालाच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात दाद मागितली आहे. याबाबत क्षीरसागर यांना कळवण्यातही आले आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.