कामगारांसोबतच्या भेटीनंतर शरद पवार यांची सायरस मिस्त्री यांच्याशी चर्चा

टाटा मोटर्स कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात वेतनवाढ करारावरून सुरू असलेला संघर्ष सोडवण्यासाठी कंपनीतील कामगार संघटनेने ज्येष्ठ खासदार शरद पवार यांना मध्यस्थी करण्याचे साकडे घातले. त्यानुसार, पवारांनी कामगार प्रतिनिधींकडून सर्व विषय समजून घेत कंपनीचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि कामगारांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. त्यानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिस्त्री यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

टाटा मोटर्स कंपनीत जवळपास ११ महिन्यांपासून रखडलेला वेतन करार व अन्य मागण्यांवरून कामगार व व्यवस्थापन यांच्यात संघर्ष सुरू आहे. गेल्या २५ दिवसांपासून कामगारांनी कंपनीचा नाश्ता व जेवणावर बहिष्कार घातला आहे. काही दिवसांपासून जेवणाच्या सुट्टीत जवळपास पाच हजार कामगार व्यवस्थापनाच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढत आहेत. मंगळवारी कामगारांचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाऊन कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांना भेटले असता, दोनच दिवसांत संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर हे शिष्टमंडळ मुंबईतच असलेल्या शरद पवार यांनाही भेटले. माजी मंत्री शशिकांत िशदे यांनी ही भेट घडवून दिली. समीर धुमाळ, संजय काळे, संतोष सपकाळ, अबीद अली सय्यद आदींशी जवळपास पाऊण तास झालेल्या चर्चेत पवारांनी संघर्षांची कारणे, कंपनीचे व कामगारांचे म्हणणे समजून घेतले. त्यानंतर, त्यांनी सायरस मिस्त्री यांना दूरध्वनी केला. पवार यांनी वादाची पाश्र्वभूमी थोडक्यात सांगितली. कामगार २५ दिवस कंपनीचे जेवण घेत नाहीत. वेतनवाढीसाठी १५ वेळा बैठका झाल्या, त्यात तोडगा निघत नाही, पारंपरिक पद्धतीने करार व्हावा, असे कामगारांचे म्हणणे आहे, याकडे पवारांनी त्यांचे लक्ष वेधले.

पाच-सहा मिनिटे मिस्त्री व पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर ‘तुम्ही यात वैयक्तिक लक्ष घाला’ अशी विनंती पवारांनी त्यांना केली. तेव्हा सकारात्मक निर्णय घेऊ, असे मिस्त्री यांनी पवारांना सांगितले.