रतन टाटा यांची अपेक्षा, कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त

पिंपरी : व्यवस्थापन आणि कामगार संघटना एकत्र असल्यास, ते कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकतात. याच एकजुटीच्या आणि निष्ठेच्या जोरावर टाटा मोटर्सला भारतीय बाजारपेठेत सर्वोच्च स्थान मिळावे, अशी अपेक्षा टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी टाटा मोटर्स कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या चाळीस जणांच्या शिष्टमंडळाने टाटा यांची भेट घेतली त्या वेळी टाटा यांनी या सर्वाशी संवाद साधला.

पुणे प्रकल्पातील ‘लेक हाउस‘ येथे रतन टाटा काही दिवसांपासून मुक्कामी आहेत. ही सुवर्णसंधी साधून मंगळवारी या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. सुमारे तासभर ही भेट झाली. कामगारांनी टाटा यांचे आशीर्वाद घेतले. कामगारांच्या वतीने टाटा यांना विठ्ठलाची मूर्ती आणि पगडी भेट म्हणून देण्यात आली. या वेळी टाटा यांनी सर्वाशी संवाद साधला.

आठ वर्षांनंतर कामगार प्रतिनिधींशी अशाप्रकारे भेट होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कामगार संघटनेने कायम पाठबळ दिले. मला तुमचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मला आणखी काही द्यायचे असेलच, तर भारतीय बाजारपेठेत कंपनीला सर्वोच्च स्थान मिळावून द्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण ‘इंडिका’ तयार केली, तेव्हा अनेकांनी आपल्यावर टीका केली. मात्र, कामगार व व्यवस्थापनाने नंतर जे काही करून दाखवले, ते अभिमानास्पद होते, असे त्यांनी आवर्जून सांगितले. कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन लांडगे यांच्यासह संतोष दळवी, अशोक माने, संतोष सपकाळ, आबिद सय्यद, संजय भोसले, किरण बोरगे, नयन पालांडे, नामदेव शिंत्रे, विलास सपकाळ तसेच व्यवस्थापकीय संचालक गिरीश वाघ आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

‘साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडले!’

रतन टाटा यांना प्रत्यक्षात पाहण्याची, त्यांच्याशी दोन शब्द का होईना संवाद साधण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात होती. आमच्या सुदैवाने त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेता आले. एकप्रकारे आम्हाला पांडुरंगाचे दर्शन घडले. आमच्या दृष्टीने रतन टाटा हे आमचे दैवत आहे, अशा शब्दांत कामगार प्रतिनिधींनी भेटीनंतर आपल्या भावना ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.