राज्यातील दुष्काळी परिस्थिती ध्यानात घेऊन सर्व भागधारकांचा विचार करून प्रभावीत क्षेत्र आणि वीजपुरवठय़ाची गरज भागवून पाण्याचा योग्य वापर कसा करता येईल यासाठी टाटा पॉवरचे अधिकारी पुणे आणि रायगड जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा आणि सिंचन विभाग अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समाजाच्या गरजा भागविण्यासाठी टाटा पॉवरने नेहमीच पुढाकार घेतला असून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीविषयी आम्ही तितकेच संवेदनशील आहोत, असे टाटा पॉवर कंपनीतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
टाटा पॉवरच्या जलाशयातील पाणी विविध गरजांच्या पूर्ततेसाठी वापरले जाते. तलावाच्या आसपास असलेली खेडी, कुसगाव आणि कार्ला पिण्याचे पाणी योजना, लोणावळा आणि खोपोली शहरे, उल्हासनगरचा काही भाग, बदलापूर उपनगर आणि पाताळगंगा नदीच्या काठची खेडी या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरविले जाते. कात्रज, कोलाड, रोहा, मुळशी, पौड विभाग येथील सिंचन गरजा भागविण्यासाठी आणि पाताळगंगा, रायसोनी, रोहा, बदलापूर या क्षेत्रातील औद्योगिक गरजा भागविण्यासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला वीजपुरवठा करण्यासाठी संस्थापकांनी शंभर वर्षांपूर्वी या जलाशयांची निर्मिती केली होती. कालानुसार मुंबई शहराला वीजपुरवठा करण्याच्या मुख्य उद्दिष्टासह इतर अनेक कामांसाठी या जलाशयातील पाण्याचा उपयोग व्हायला लागला, असेही कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
यंदाच्या दुष्काळी वर्षांत सर्व भागधारकांचा विचार करून प्रभावीत क्षेत्र आणि वीजपुरवठय़ाची गरज भागवून पाण्याचा वापर कसा करता येईल यासाठी टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी पुणे आणि रायगड जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा आणि सिंचन विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समाजाच्या गरजा भागविण्यासाठी आतापर्यंत टाटा पॉवरने नेहमीच पुढाकार घेतला आहे. १९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर पुण्यात आलेला महापूर आणि त्यानंतरची भीषण परिस्थिती, २००५-२००६ मध्ये महाराष्ट्रात आलेले पूर, काश्मीरमधील पूर, नेपाळमधील भूकंप आणि ओरिसातील चक्रीवादळ अशा सगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी टाटा पॉवरने नेहमीच मदतीचा हात पुढे केला होता. महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील भीषण दुष्काळी परिस्थितीविषयी आम्ही तितकेच संवेदनशील आहोत, असेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.