मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी तवेरा गाडी चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या खाली जाऊन एका झाडाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. लोणावळय़ाजवळील सिंहगड कॉलेजजवळ शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातामध्ये गाडीचा चालक सुरेश भाऊ तारमळे (वय २७, रा. शेरे, शहापूर, जि. ठाणे) आणि प्रवासी कमल दगडू पाटोळे (वय ५०, रा. उल्हासनगर, शहापूर, जि. ठाणे) हे दोघे मृत्युमुखी पडले असून, राहुल दत्तू ननावरे (वय २२, रा. टिटवाळा, जि. ठाणे) आणि भूषण संदीप पाटोळे (वय १५, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या दिशेने भरधाव जाणारी ही गाडी भरधाव वेगाने जात होती. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानंतर ती रस्ता सोडून रस्त्याखाली गेली. रस्त्याच्या कडेचे एक झाड मुळापासून तोडून सुमारे १५० फूट अंतरावर ही गाडी द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षा जाळीत अडकली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी निगडी येथे दाखल केले आणि मृतदेह खंडाळा येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर तपास करत आहेत.