इंजिनच्या क्षमतेनुसार एक ते तीन टक्क्य़ांची करवाढ
दुचाकी वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून आकारण्यात येणाऱ्या एकरकमी कराच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. आता दुचाकी इंजिनच्या क्षमतेनुसार कर आकारणी केली जाणार असून, त्यामुळे १ ते ३ टक्क्य़ांनी कर वाढणार आहे. त्याचा परिणाम दुचाकीची ‘ऑनरोड’ किंमत वाढणार आहे. ७ जूनपासून नवी कर आकारणी सुरू केली जाणार असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियमानुसार आकारण्यात येणाऱ्या कराच्या रचनेमध्ये शासनाच्या निर्णयानुसार बदल करण्यात आला आहे. पूर्वी सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांवर सात टक्क्य़ांनुसार कराची आकारणी केली जात होती. नव्या नियमानुसार कर आकारणीसाठी इंजिनची क्षमता लक्षात घेण्यात येणार असून, त्यानुसार दुचाकीची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. इंजिन क्षमता व दुचाकीच्या किमतीवर आठ ते दहा टक्के दराने कराची आकारणी केली जाणार आहे.
दुचाकीची इंजिन क्षमता ९९ सीसीपर्यंत असणाऱ्यांना ८ टक्के, ९९ सीसीपेक्षा जास्त व २९९ सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असणाऱ्या दुचाकींसाठी ९ टक्के, तर २९९ सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या दुचाकींसाठी १० टक्के कराची आकारणी केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे ५० हजार रुपये किमतीच्या दुचाकीसाठी सुमारे पाच हजार रुपयांच्या कराचा भरणा करावा लागेल.
वाढीव इंजिन क्षमता व किमती यानुसार कर वाढत जाणार आहे. पुणे शहरामध्ये सर्वाधिक वेगाने दुचाकीची खरेदी होत असते. वाढीव कराच्या रचनेमुळे शासनाच्या तिजोरीत भर पडणार असली, तरी दुचाकी खरेदी करून त्याची नोंदणी करणाऱ्यांना आता काही प्रमाणात जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.