कटिंग चहा प्यायला जायचे.. आज ऑफिसमध्येच चहा मागवू, सर जरा चहा घेऊन येतो अशी वाक्ये आपल्याला कार्यालयांमध्ये बऱ्याचदा ऐकायला मिळतात. कटिंग चहा विकणाऱ्या चहावाल्याचे महिन्याचे उत्पन्न किती असेल? कुणी म्हणेल काही हजारांच्या घरात असेल. १५ ते २५ हजार किंवा फार तर ३० ते ४० हजार. पण पुण्यातील एका चहाविक्रेत्याची महिन्याची कमाई किती आहे ठाऊक आहे? १२ लाख रुपये. होय पुण्यातील येवले टी हाऊस हे ‘चहाबाज’ लोकांचे आवडते ठिकाण. पुण्यातील निवडक प्रसिद्ध चहा विक्रेत्यांपैकी येवले टी हाऊस एक आहे. येवले टी हाऊसची महिन्याची कमाई १२ लाख रुपये आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

येवले टी हाऊसची महिन्याची कमाई १२ लाखांच्या घरात गेली आहे.

चहा विक्रीचा व्यवसाय भारतीयांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देतो आहे. या व्यवसायातून चांगली कमाई होत असल्याने मी समाधानी आहे असे येवले टी हाऊसचे सहमालक नवनाथ येवले यांनी सांगितले आहे. तसेच येवले टी हाऊसचा चहा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवायचे आमचे स्वप्न आहे असेही येवले यांनी स्पष्ट केले. पुण्यात आमच्या तीन शाखा आहेत. प्रत्येक ठिकाणी १२ कर्मचारी काम करतात. लवकरच येवले टी हाऊसचा ब्रांड जगभरात पोहचावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही आखणी करत आहोत असेही येवले यांनी स्पष्ट केले आहे.

व्यवसायापेक्षा नोकरी श्रेष्ठ अशी मानसिकता असलेला एक वर्ग आजही समाजात आहे. पण मेहनत करण्याची इच्छा असेल तर एखादा व्यावसिक चहा विक्रीच्या व्यवसायातूनही किती मोठ्याप्रमाणावर उत्पन्न मिळवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे येवले टी हाऊस आहे.