भाजपा शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप देताना दिसते आहे कारण त्यांच्यात गुरु शिष्याचं नातं आहे असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिरुरमधल्या शेतकरी मेळाव्यात लगावला. शरद पवारांचं बोट धरून आपण राजकारणात आलो असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं त्याचाच समाचार घेत उद्धव ठाकरेंनी ही टीका केली. तसेच २०१४ मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा जाहीर करून शिवसेनेची गोची केली होती. त्याचाही राग उद्धव ठाकरेंच्या मनात आहेच हे दाखवणारेच हे वक्तव्य आहे. शिरुरमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थापाडे म्हणत त्यांच्या आश्वासनांना काहीही अर्थ नसतो असे म्हटले आहे.

२०३० पर्यंत सगळ्यांना घरं मिळतील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. म्हणजे तुम्हाला तोपर्यंत यांना निवडून द्यावं लागणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त खोटं बोलता येतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातील सलगीबद्दलही त्यांनीही टीका केली आहे. भाजपा आणि शिवसेना हे खरे तर सत्तेतले मित्रपक्ष आहेत मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्याचाच प्रत्यय उद्धव ठाकरेंच्या भाषणातूनही आला.

राष्ट्रवादीची मला काळजी वाटते आहे, आजूबाजूला दुष्काळ पडतो आहे, तेव्हा राष्ट्रवादीवाल्यांना धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका असं म्हणत अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याची आठवणही त्यांनी करून दिली. राफेल कराराला नेमका विरोध आहे की पाठिंबा ते काकांना विचार असा टोलाही अजित पवारांना त्यांनी लगावला.