15 November 2019

News Flash

पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक दारोदारी!

गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या, खासगी शाळा वाढल्यानंतर त्याचा सरकारी शाळांना फटका बसू लागला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

उन्हाळी सुटीवर पाणी; गुणवत्ता असूनही मराठी माध्यमामुळे शाळांमध्ये प्रवेश कमी

सरकारी शाळांमधील आणि खासगी संस्थांच्या अनुदानित शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी आता शिक्षकांनाच प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात दारोदारी फिरत आहेत.

गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या, खासगी शाळा वाढल्यानंतर त्याचा सरकारी शाळांना फटका बसू लागला आहे. अनेक शाळांची गुणवत्ता असूनही केवळ मराठी माध्यमामुळे या शाळांमध्ये प्रवेश कमी होत आहेत. तसेच ५० वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या संस्थांच्या अनुदानित, विशेषत मराठी माध्यमाच्या शाळांचीही विद्यार्थीसंख्या झपाटय़ाने घटत आहे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संख्या टिकवण्याचे आव्हान शाळांसमोर आहे. त्यावर उपाय म्हणून उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक विद्यार्थ्यांचा शोध घेऊन पटसंख्या वाढवण्याचे काम करत आहेत.

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी ‘पटनोंदणी आपल्या दारी’ हे अभियान राबवण्यात येत आहे. बालवाडी सेविका, शिक्षक दोन तास वस्त्यांमध्ये जाऊन शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. शिक्षक पालकांची भेट घेऊन त्यांना शाळेविषयी, शाळेत दिल्या जाणाऱ्या सुविधांविषयी माहिती देतात. त्यांचे प्रबोधन करतात. तसेच सुटी असूनही रोज दोन तास शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून पालक प्रवेश घेण्यासाठी आल्यास त्यांना विनाअडचण प्रवेश घेता येईल. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याचा पटसंख्या वाढण्यासाठी नक्कीच फायदा होईल. १७ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर पटसंख्येत किती वाढ झाली याची नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे महापालिकेया शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी दौंडकर यांनी सांगितले.

अभियांत्रिकी प्रवेशांसाठीही प्राध्यापकांची वणवण

एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळांना घटत्या विद्यार्थीसंख्येला सामोरे जावे लागत असताना अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही तीच स्थिती आहे. गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशही झपाटय़ाने कमी झाले आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागाही मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहात आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी संस्थांच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यार्थी आणण्याचे काम करावे लागत आहे. पुरेसे प्रवेश न झाल्यास नोकरीवर गदा येण्याचा धोका असल्याने विद्यार्थी आणण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती एका प्राध्यापकाने दिली.

First Published on May 23, 2019 12:27 am

Web Title: teacher in search of students to increase the number