महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षकांकडून मोबाईल आणि अन्य समाजमाध्यमांचा वापर होत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत असून अखेर या प्रकाराबाबत आता अधिकृतरीत्या पालिका आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
महापालिका शाळांमधील शिक्षक वर्गावर प्रत्यक्ष तास घेत असताना, तसेच दोन तासिकांच्या मध्यल्या वेळेत आणि शालेय कामकाजातील इतर वेळांमध्ये सर्रास मोबाईलचा वापर करत असल्याच्या तक्रारी यापूर्वी वेळोवेळी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याबाबत अद्यापही विशेष दखल घेण्यात आलेली नाही. नगरसेवकांनीही या प्रकारांबाबत यापूर्वी तोंडी तक्रारी केल्या होत्या. बहुतेक सर्व खासगी शाळांमध्ये नेमकी या उलट परिस्थिती असून तेथील शिक्षक वर्गावर असताना वा शाळेच्या अन्य वेळेत मोबाईल वापरत नाहीत. महापालिका शाळांमधील शिक्षक मात्र शाळेच्या वेळेतच मोबाईलचा भरपूर वापर करतात अशी तक्रार आहे. शाळेत वर्गावर शिकवत असताना शिक्षकांकडून मोबाईलवर संभाषण सुरू असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.
केवळ मोबाईलचा वापरच नाही, तर वर्गावर शिकवत असताना एखाद्या शिक्षकाला मोबाईलवर कॉल आला तर शिकवण्याचे काम थांबवून शिक्षक तो कॉल स्वीकारतात आणि वर्गात विद्यार्थ्यांसमोर मोबाईलवर संभाषण करतात. या शिवाय व्हॉटस्अप, फेसबुक या समाजमाध्यमांवरही शिक्षक शाळेत असतानाच सक्रिय असतात. महापलिका शाळांमधील विद्यार्थ्यांकडूनही शिक्षकांचे अनुकरण काही प्रमाणात होत असून अनेक विद्यार्थी देखील शाळेत मोबाईल घेऊन यायला लागले आहेत. या सर्व प्रकारांबाबत पालकांनी स्थानिक नगरसेवकांकडेही तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन उपमहापौर आबा बागुल यांनी महापालिका आयुक्तांना आणि शिक्षण प्रमुखांना पत्र दिले असून मोबाईलचा वापर थांबवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. महापालिका शाळांमधील शिक्षकांचे मोबाईल शाळेच्या वेळेत त्या त्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे वा प्राचार्याकडे जमा करावेत आणि तितकेच महत्त्वाचे काम असेल तर शिक्षकांशी शाळेच्या दूरध्वनीवरही संपर्क साधता येऊ शकतो. त्यामुळे शाळेच्या वेळेत मोबाईल वापरावर पूर्णत: र्निबध आणावेत, अशी मागणी या पत्रातून आयुक्त आणि शिक्षण प्रमुखांकडे करण्यात आली आहे.